राजधानी साताऱ्यात थोड्याच वेळात धडाडणार मनोज जरांगे पाटलांची तोफ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेले संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील हे मराठा आरक्षण रॅलीसाठी राजधानी साताऱ्यात आज दि. १० रोजी सकाळी येत आहेत. साताऱ्यातील पोवई नाका येथे छ. शिवाजी महाराजांना पुतळ्यास अभिवादन करुन या रॅलीला सुरुवात होणार आहे. दरम्यान, ऐतिहासिक गांधी मैदान येथे जरांगे यांची तोफ धडाडणार आहे. त्याच्या रॅलीची जय्यत तयारी जिल्हा मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांच्या वतीने करण्यात आलेली आहे.

मनोज जरांगे-पाटील हे साताऱ्यात लोकसभा निवडणूकीच्या अगोदर आले, तेव्हा गांधी मैदान येथे सभा झाली होती. त्यानंतर मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्य्यात साताऱ्यात येत आहेत. ही रॅली कोल्हापूरहून राजधानी दि. १० रोजी सकाळी येत आहेत. ज्याप्रमाणे मराठा क्रांती मोर्चा ऐतिहासिक केला तशी ही रॅली यशस्वी करण्यासाठी जिल्हा मराठा क्रांती मोर्चाने तयारी केली आहे. दि. सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास मनोज जरांगे-पाटील हे साताऱ्यात येणार आहेत. कराड, उंब्रज, अतीत, काशीळ, नागठाणे, बॉम्बे रेस्टॉरंट चौक याठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे.

शिवतीर्थ येथे त्यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे. छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन दुपारी १२:३० वाजता रॅलीला सुरुवात होणार आहे. ही रॅली पारंपारिक वाद्यात झांजपथक, ढोल ताशा, तुतारी, हलगीच्या वाद्याच्या गजरात छ. शाहु महाराज चौक, कमानी हौद, मोती चौक मार्गे राजवाडा येथे पोहचणार आहे. तेथे पोहचल्यानंतर गांधी मैदानावर मनोज जरांगे-पाटील यांची तोफ गांधी मैदानावरुन धडाडणार आहे. त्यानंतर मनोज जरांगे हे खा. छ. उदयनराजे भोसले आणि आ. शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेवून, छ. शिवाजी महाराज संग्रहालयातील – असणाऱ्या ऐतिहासिक वाघनखे पाहणार आहेत.