मनोज जरांगे-पाटील शनिवारी साताऱ्यात; कराडला जंगी स्वागत तर साताऱ्यात निघणार भव्य रॅली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । मराठा आरक्षणासाठी अहोरात्र लढा देणारे मनोज जरांगे-पाटील हे शनिवार, दि. १० रोजी साताऱ्यात आहेत. यानिमित्त साताऱ्यात मराठा आरक्षण जनजागृती व भव्य शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत बाँबे रेस्टॉरंट ते गांधी मैदान अशी भव्य रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीचा मार्ग भगवामय करण्यात येणार असून, त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील हजारो मराठा बांधव या रॅलीस उपस्थित राहणार आहेत.

मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीचा दुसरा टप्पा मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केला आहे. ही रॅली कोल्हापूरहून राजधानी साताऱ्यात येत्या शनिवारी सकाळी येणार आहे. ज्याप्रमाणे मराठा क्रांती मोर्चा ऐतिहासिक केला, तशी ही रॅली यशस्वी करण्यासाठी जिल्हा मराठा क्रांती मोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यामध्ये मनोज जरांगे- पाटील बाँबे रेस्टॉरंट या ठिकाणाहून पोवई नाक्याकडे रॅली मार्गाने येतील. येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून शाहू चौक, राजपथ मार्गे गांधी मैदान अशी पुढे रॅली मार्गस्थ होईल. त्यानंतर गांधी मैदान येथे ते जनसमुदायाला संबोधित करणार आहेत.

ढोल, ताशा पथक, झांजपथक, तुतारीने स्वागत केले जाणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणनिहाय बैठका घेणे, गावोगावी रॅलीबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी लढा सुरू ठेवला आहे. त्यांच्या उपस्थितीत साताऱ्यात १० ऑगस्टला शांतता रॅली काढण्यात येणार आहे. जरांगे पाटील साताऱ्याला जाणार आहेत. त्यामुळे त्यांचे कराड येथील पाटण तिकाटण्यात जंगी स्वागत करण्यात येणार आहे. याठिकाणी शक्तिप्रदर्शन करण्यात येईल.