महायुतीकडून कराड उत्तरसाठी मनोज घोरपडेंना उमेदवारी जाहीर; उद्याच भरणार अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | जिल्ह्यातील बहुचर्चित कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू होती. या मतदारसंघामध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि कराड उत्तरचे निवडणुक प्रमुख मनोज घोरपडे या दोघांमध्ये समेट घडवून आणण्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना अखेर आज यश आले असून शनिवारी मध्यरात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून मनोजदादा घोरपडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.

शनिवारी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ आणि भाजपाचे पदाधिकारी उपस्थितीत एक बैठक पार पडली. यावेळी कदम आणि घोरपडे यांनी पक्ष बांधणीसाठी आपापल्या परीने केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. सोबतच गत लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार खा. उदयनराजे भोसले यांच्या विजयासाठी दोघांनीही केलेल्या नियोजनबद्ध कामाची चर्चा केली.

यावेळी फडणवीस यांनी अनेक वर्षे आपण संघर्ष करत आहात. आता या संघर्षातून महायुतीला एक आमदार मिळणार आहे. त्यासाठी मनोज घोरपडे हेच उमेदवार असतील. त्यांनी भाजपा महायुतीचे उमेदवार म्हणुन अर्ज भरावा. त्यांना ए बी. फॉर्म देण्याची व्यवस्था केली जाईल असे फडणवीस यांनी सांगितले. तसेच येत्या काळात धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ यांच्या पक्ष कार्याची नक्कीच दखल घेतली जाईल.

या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी युतीधर्माचे तंतोतंत पालन करण्याचेही बैठकीत ठरले आहे. दरम्यान, सोमवार दि. २८ रोजी ९ ते ११ दरम्यान कराड येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून मनोजदादा घोरपडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे.