शरद पवारांना साताऱ्यात सर्वात मोठा झटका; फलटणमध्ये राजे गटाला पडलं खिंडार; जिल्हा परिषदेच्या ‘या’ माजी अध्यक्षाने कमळ घेतलं हाती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील अनेक राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. पुन्हा एकदा पक्षातील स्थानिक आजी-माजी नेत्यांना फोडाफोडीचे राजकारण सुरु झाले आहे. या फोडाफोडीच्या राजकारणात फलटण विधानसभा मतदार संघात अनेक घडामोडी घडू लागल्या आहेत. दरम्यान, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी राजे गटाला राम राम ठोकत पाच हजार कार्यकर्त्यांसह माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच सोनवलकर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांना साताऱ्यात विधानसभा निवडणुकीच्या आधी हा मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. 

सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी राजे गटाला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश करत असताना यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तथा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांची सुद्धा उपस्थिती होती.

फलटण तालुक्यातील राजकारणात मोठं नाव असलेले माणिकराव सोनवलकर हे विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी राजकारणात प्रवेश केल्यापासून राजे गटासोबत राहिले होते. त्यांनी दुधेबावी ग्रामपंचायतीपासून अगदी सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदापर्यंत त्यांनी मजल मारली होती. त्यानंतर सोनवलकर व त्यांची पत्नी सुद्धा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण एज्युकेशन सोसायटीमध्ये सेवेमध्ये आहेत.

फलटणमधील विविध गावच्या सरपंचांचा राजे गटाला राम राम

फलटण पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय सोडमिसे, माजी पंचायत समिती सदस्य संजय कापसे, संतकृपा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा विलासराव नलवडे, फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक अजय माळवे, युवा नेते सुधीर अहिवळे यांच्यासह फलटण तालुक्यातील विविध गावच्या सरपंचांनी राजे गटाला राम राम ठोकत खासदार गटांमध्ये प्रवेश केला आहे.

बावनकुळे यांचा मविआवर निशाणा

“महाविकास आघाडीचे नेते जनतेत मतभेद आणि द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते जात, धर्मावरुन नागरिकांना भडकवण्याचं काम करत आहेत. राज्यात जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा विरोधी पक्षात कोणत्याही प्रकारचं घाणेरडं राजकारण व्हायचं नाही. पण तसं राजकारण आज विरोधी पक्षांकडून होत आहे. काँग्रेस लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचं काम करत आहे”, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केला.