मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षामुळे वाचले 35 हजार रुग्णांचे प्राण, 2 वर्षात 275 कोटींची मदत : मंगेश चिवटे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | ‘राज्य शासनाने सुरू केलेल्या वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाद्वारे दोन वर्षात ३५ हजार रुग्णांचे प्राण वाचवण्यात यश आले आहेत. तसेच या कक्षाद्वारे २७५ कोटीची वैद्यकीय मदतही करण्यात आली आहे,’ अशी माहिती सहाय्यता कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी आज साताऱ्यात पत्रकार परिषदेत दिली.

वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी आज सातारा येथील शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात वैद्यकीय मदत कक्ष मृतावस्थेत होता. मात्र, महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाची स्थापना करण्यात आली. या कक्षाच्या माध्यमातून दुर्धर रोगांवरील उपचार तसेच विविध शारीरिक अवयवांचे प्रत्यारोपणा करिता एक लाख रुपयांची मदत करण्यात येत आहे.

यासाठी विहित नमुन्यातील अर्ज, वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र, तहसीलदार कार्यालयाच्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला, रुग्णांचे आधार कार्ड, लहान बाळासाठी आईचे आधार कार्ड, रुग्णाचे रेशन कार्ड ,आजाराचे रिपोर्ट, अपघातग्रस्त रुग्णांसाठी पोलिस डायरी रिपोर्ट, प्रत्यारोपणासाठी शासकीय समितीची मान्यता आणि पेपर स्कॅन करून पीडीएफ फाईल ई-मेल आयडी वर पाठवणे अशा अटींची पूर्तता करावी लागते. याशिवाय इतर आजारांसाठी सहाय्यता कक्षाच्या वतीने वीस हजार रुपयाची मदत करण्यात येते. या योजनेद्वारे महाराष्ट्रातील ३५ हजार रुग्णांचे प्राण वाचवण्यात या कक्षाला यश आले आहे.

महाविकास आघाडीच्या काळात या कक्षामध्ये दोन वर्षात केवळ अडीच कोटींची मदत झाली होती. मात्र महायुतीचे शासन आल्यानंतर दोन वर्षात २७५ कोटीची वैद्यकीय मदत देण्यात आली. ‘ना वशीला.. ना ओळख.. थेट मिळते मदत’ या संकल्पनेनुसार कक्षाचे काम सुरू असून, रुग्णांनी कोणालाही मध्यस्थी न करता ८६५० ५६७ ५६७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंगेश चिवटे यांनी केले आहे.