सातारा प्रतिनिधी | लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्री काळबाई देवीचे मंदिर दि. 7 ते 11 जानेवारी या 5 दिवसांच्या कालावधीत बंद राहणार आहे. याबाबतची माहिती मांढरदेव टस्ट्रकडून देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, वाई तालुक्यातील मांढरदेव देवस्थान परिसरात गेल्या वर्षभरा पासून अनेक विकास कामे सुरु असून मांढरदेव देवस्थान ट्रस्ट मार्फत सुरु असलेल्या या विकासकामांमुळे मांढरदेव मंदिर परिसराचे रुपडे पालटू लागले आहे. या विकासकामांमध्ये महत्वाचे असलेले मंदिराकडे जाणार्या चढणी उतरणीच्या पायर्यांचे नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. चढणी उतरानीच्या पायर्यांच्या दोन्ही बाजूला संरक्षण भिंत बांधण्याचे काम देखील सुरु आहे. यामुळे मंदिर बंद ठेवावे लागणार आहे.
त्यातच सध्या मांढरदेव गावातून देवीच्या मंदिराकडे जाणार्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू असून या कामामुळे देवीला येत असलेल्या भाविकांना बर्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पायर्यांचे काम व रस्त्याचे काम गतीने सुरु असून येत्या पाच दिवसात ते पूर्ण होईल. मात्र, भाविकांना अडचणींना सामोरे जावू लागू नये म्हणून देवस्थान प्रशासनाकडून देवीचे मंदिर पाच दिवस म्हणजे रविवार दि. 7 ते शुक्रवार दि. 11 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.