हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांना नुकतीच एक धमकी देण्यात आली. त्यांना देण्यात आलेल्या धमकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी ठिकठिकाणी निषेध आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील माण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दहिवडीत निषेध मोर्चा काढून फलटण चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. यावेळी ‘शरद पवारांच्या केसालाही धक्का लागला, तर गाठ आमच्याशी आहे,’ असा इशारा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आला.
माण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी शासकीय विश्रामगृहापासून फलटण चौकापर्यंत निषेध मोर्चा काढला. तसेच फलटण चौकात रस्ता रोको आंदोलनही केले. यावेळी पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी प्रशांत वीरकर म्हणाले, ‘या सरकारने जातीयवाद्यांना आवर घातला नाही, तर जशास तसे उत्तर दिले जाईल.’
‘आमच्या नेत्यांना दिलेल्या धमक्या सहन केल्या जाणार नाहीत. दिल्लीमधील आंदोलन असेल, या रेल्वे अपघात. यासारखे विषय दडपण्यासाठी राज्यात कट कारस्थाने रचली जात आहेत, तसेच अनेक वेळा शरद पवारांवर खालच्या पातळीवर टीका करून माध्यमातून प्रसिद्धी मिळविण्याचा जो धंदा चालू आहे. तो तत्काळ थांबवा, अन्यथा होणाऱ्या परिणामास समाेरे जाण्याचीही तयारी ठेवा,’ असा इशारा महेश जाधव यांनी दिला.
यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना धमकीच्या निषेधाचे निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते मनोज पोळ, सुभाष नरळे, बाळासाहेब सावंत, नगराध्यक्ष सागर पोळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे, तानाजी कट्टे, खटाव तालुका महिलाध्यक्षा डाॅ.प्रियांका मानेंसह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.