सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील महत्वाच्या पंचायत समितींपैकी एक म्हणून माण पंचायत समितीची ओळख आहे. या पंचायत समितीची इमारत धोकादायक बनल्यामुळे या आमटीच्या जागी नव्याने दुसरी इमारत करण्यात यावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. ती मागणी आता पूर्णत्वास आली असून या ठिकाणी नवीन इमारत होणार आहे. त्यासाठी २३ कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे तीन वर्षांत सुसज्ज अशी इमारत उभी राहणार असल्याचे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी सांगितले.
सातारा जिल्हा परिषदेत नुकतीच एक आढावा बैठक पार पडली. यावेळी अतिरक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे, बांधकाम दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल अहिरे आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी खिलारी म्हणाले, माण पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकामास प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. त्याप्रकारे ग्रामविकास विभागाने शासन निर्णय जारी केला आहे. नूतन इमारतीचे सुमारे २३ कोटी रुपये इतके अंदाजपत्रक आहे. ही नवीन प्रशासकीय इमारत दहिवडीतील पशुवैद्यकीय जागेच्या ठिकाणी होणार आहे. इमारत बांधकामाचे एकूण क्षेत्रफळ ५ हजार ४६६.९२ चौ.मी. इतके प्रस्तावित करण्यात आलेले आहे.