सातारा प्रतिनिधी | वडूज येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आठ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकास २० वर्षे सश्रम कारावास व चार हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
गजानन अनंता खैरे (वय ३२, रा. कल्याण, ता. मेहकर, जि. बुलडाणा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, खटाव तालुक्यातील म्हासुर्णे येथे बुलडाणा येथील एक कुटुंब ऊस तोडीच्या कामासाठी आले होते. ते कोपित वास्तव्यास होते. आई – वडील ऊस तोडीस गेले पाहून आरोपी गजानन खैरे याने कोपित जाऊन त्यांच्या आठ वर्षीय मुलीस “तुला मोबाईल दाखवतो,” असे सांगून बाहेर नेले. नजीक असलेल्या आंब्याच्या झाडाखाली नेवून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. याप्रकरणी वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
गुन्ह्यात पोलिस उपअधीक्षक डॉ. नीलेश देशमुख यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले. पोलिस हवालदार रामचंद्र तांबे व गणेश पवार यांनी तपासात मदत केली, तसेच वैद्यकीय पुरावे जमा करून आरोपीविरुद्ध जिल्हा व सत्र न्यायालय, वडूज येथे दोषारोपपत्र दाखल केले.
सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील आर. डी. खोत यांनी काम पाहिले. यामध्ये साक्षीदारांचे जबाब, पुरावे व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश एन. एस. कोलेसो यांनी आरोपी गजानन खैरे यास पोक्सोंतर्गत २० वर्षे सश्रम कारावास व चार हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रॉसिक्युशन स्क्वाड पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव, हवालदार विजयालक्ष्मी दडस, सागर सजगणे, आमीर शिकलगार, जयवंत शिंदे यांनी सहकार्य केले.