सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात आठ विधानसभा मतदार संघात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, जिल्ह्यातील आठ मतदारसंघांसाठी २६ लाख २८ हजारांहून अधिक मतदारांची नोंद झालेली आहे. यामध्ये तृतीयपंथी मतदार ११२ आहेत. तर सर्वाधिक पुरुष आणि महिला मतदारांची संख्या माण मतदारसंघात आहे.
जिल्ह्यातील विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. यातील सहा मतदारसंघ हे सातारा लोकसभा मतदारसंघात येतात. तर माढा लोकसभा मतदारसंघात माण आणि फलटण विधानसभेचा समावेश आहे. जिल्ह्यातील मतदारांचा विचार करता १५ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात २६ लाख २८ हजार ८७१ मतदारांची नोंद झालेली आहे. हे सर्व मतदार नाव नोंद असणाऱ्या विधानसभा मतदारसंघात मतदान करण्यासाठी पात्र आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात मतदारांची संख्या वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे 65 हजार 893 मतदार वाढले आहेत. हे मतदार 20 नोव्हेंबरला प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये नवमतदारांची संख्या सातारा जिल्ह्यात सर्वाधिक आहे. जिल्ह्यात एकूण 29 लाख मतदार असून, त्यापैकी केवळ 60 ते 63 टक्के मतदान होत असते. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मतदान केंद्रांची संख्या वाढवणे, मतदारांमध्ये प्रबोधन करणे, मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर विशेष सोयीसुविधा उपलब्ध करणे इत्यादी पावले उचलली आहेत.
१३ लाख महिला मतदार
जिल्ह्यात आठही विधानसभा मतदारसंघात १३ लाख ३१ हजार २५४ पुरुष मतदारांची संख्या नोंद झालेली आहे. तर महिला मतदार १२ लाख ९७ हजार ५०५ आहेत. माण मतदारसंघात सर्वाधिक १ लाख ७४ हजार ७३१ महिला मतदार आहेत. तसेच माण मतदारसंघात एकूण ३ लाख ५७ हजार ८४१ मतदारांची नोंद १५ ऑक्टोबरपर्यंत झालेली. त्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक मतदार माण मतदारसंघातच असल्याचे स्पष्ट झालेले आहे.