सातारा प्रतिनिधी । महायुतीतील भाजप आणि मुख्यमंत्री शिंदेच्या शिवसेनेनं नुकतीच आपली पहिली यादी जाहीर करत आघाडी घेतली आहे. त्यांच्यानंतर आज राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar)गटाची ३८ उमेदवारांची देखील पहिली यादी जाहीर झाली. सातारा जिल्ह्यातील फक्त वाई विधानसभा मतदार संघातून मकरंद पाटील यांचा यादीत समावेश आहे. काही दिवसांपूर्वी फलटणमधून उमेदवारी घोषित केलेल्या दीपक चव्हाण यांनी साथ सोडल्यानंतर येथील जागेला उमेदवारच उरला नसल्याने ती जागा भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. तर कराड उत्तर विधानसभा मतदार संघात अजितदादा गटाकडून चाचपणी सुरु असली तरी ‘उत्तर’ मात्र सापडेनासे झाले आहे.
कराड उत्तर या मतदारसंघात कायम नाराजी व जोरदार लढतीची चर्चा असते. पण ऐनवेळी ती विरून जाते. कारण सलग १५ वर्षे विद्यमान आमदारांच्या विरोधात येथे स्थानिक उमेदवार दिला गेलेला नाही. त्यामुळे बदल हवाय असा बोलबाला जरी होतो तरी बहिस्थ उमेदवारांसाठी बदल करण्याची लोकांची मानसिकता होत नाही हे इथले नेहमीचे सूत्र आहे व त्याचाच फायदा ऐनवेळी विद्यमान आमदारांना दरवेळी झालेला दिसून येतो. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर कराड उत्तर विधानसभा मतदार संघ तसा पहिला तर महायुतीत अजितदादा पवार गटाकडे जायला हवा. मात्र, या मतदार संघावर भाजप आणि आताशी शिंदे गटाची शिवसेनेने डोळा लावून बसल्याने या मतदार संघातील जागा वाटपाचे सूत्र मात्र महायुतीत अजूनही सुटलेले नाही. मात्र, सध्या कराड उत्तर विधानसभा मतदार संघात अजितदादा गटाकडून उमेदवाराची चाचपणी केली जात आहे. रात्रीच्या बैठका आणि दिवसभरात गटातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा अशा घडामोडी या ठिकाणी घडत आहेत.
उमेदवारपासून जिल्हाध्यक्षाची शोधाशोध…
विधानसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. यातूनच पक्षांतराचे वारेही जोरात सुटले आहेत. सातारा जिल्ह्यातही घडामोडींना वेग आला आहे. अशातच फलटणमधील राजकीय विरोधक माजी खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर आणि विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक – निंबाळकर यांच्यातील शीतयुध्दाने तीव्र स्वरुप घेतले. दोघेही महायुतीत असतानाही वेगळ्या भूमिका राहिल्या. त्यामुळे रामराजेंचे बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक – निंबाळकर तसेच फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनी वेगळी वाट धरली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यामुळे आता राष्ट्रवादीवर नवीन जिल्हाध्यक्ष शोधण्याची वेळ आली आहे.
वर्षभरातच जिल्हाध्यक्षांनी घेतला काडीमोड
मागील वर्षी जुलै महिन्यात राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार महायुतीबरोबर गेले. त्यावेळी राष्ट्रवादीकडे जिल्हाध्यक्षच नव्हता. दोन महिन्यांनंतर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक – निंबाळकर यांची नियुक्ती झाली. पण, वर्षभरातच जिल्हाध्यक्षांनी काडीमोड घेतला. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पक्षासाठी नवीन जिल्हाध्यक्ष शोधावा लागणार आहे. यासाठी राजकीय ताकद, आर्थिक सक्षमता या बाजू विचारात घेऊनच अध्यक्ष नियुक्ती होऊ शकते. यासाठी अजून किती दिवस लागणार, हे समजणे अवघड आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली उमेदवार यादी
बारामती- अजित पवार
आंबेगाव- दिलीप वळसे पाटील
अमरावती- सुलभा खोडके
इंदापूर- दत्तात्रय भरणे
पिंपरी- अण्णा बनसोडे
पाथरी- निर्मला विटेकर
मावळ – सुनील शेळके
येवला- छगन भुजबळ
कागल- हसन मुश्रीफ
सिन्नर – माणिकराव कोकाटे
श्रीवर्धन – अदिती तटकरे
उदगीर- संजय बनसोडे
अर्जुनी मोरगाव राजकुमार बडोले
माजलगाव- प्रकाश सोळंखे
वाई – मकरंद पाटील
खेड आळंदी- दिलीप मोहिते पाटील
अहमदनगर – संग्राम जगताप
इंदापूर- दत्तात्रय भरणे
अहमदपूर- बाबासाहेब पाटील
कळवण- नितीन पवार
कोपरगाव- आशुतोष काळे
अकोले- किरण लहामटे
वसमत – राजू नवघरे
चिपळूण- शेखर निकम
जुन्नर- अतुल बेनके
मोहोळ- यशवंत माने
हडपसर- चेतन तुपे
देवळाली- सरोज अहिरे
चंदगड- राजेश पाटील
इगतपुरी – हिरामण खोसकर
तुमसर- राजू कारेमोरे
पुसद- इंद्रनील नाईक
नवापूर- भरत गावित
मुंब्रा कळवा- नजीब मुल्ला