वाईत पुन्हा मकरंद आबांचा विजय; पवार गटाच्या अरुणादेवी पिसाळ यांचा पराभव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात विधानसभेच्या आठही जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळविल्यामुळे जिल्ह्यात शरद पवार आणि काँग्रेसचा एकेकाळचा गड ढासळला असून महायुतीचाच बालेकिल्ला तयार झाला आहे. भाजपच्या चार, शिंदेसेनेच्या दोन आणि अजित पवार गटाने दोन जागांवर विजय मिळवत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देखील विजयापर्यंत पोहोचू दिले नाही. वाई विधानसभा मतदारसंघातही अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या मकरंद पाटील यांनी ५० हजारांहून अधिकचे मताधिक्य घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अरुणादेवी पिसाळ यांचा पराभव केला आहे. मकरंद पाटील यांना 1 लाख 40 हजार 971 मते पडली. तर अरुणादेवी पिसाळ यांना 79 हजार 579 मते पडली.

वाई विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदाम क्रमांक ५ येथे आज पार पडली. टपाली व ईव्हीएम मशीनद्वारे मतमोजणीसाठी एकूण २९ टेबलद्वारे ४७१ मतदान केंद्रांच्या मोजणीसाठी २४ फेऱ्यांद्वारे निकाल जाहीर करण्यात आला. ईव्हीएम मतदान यंत्रांच्या मतमोजणीसाठी एकूण २० टेबल्स ठेवण्यात आली होती. टपाली मतपत्रिका मोजण्यासाठी ६ टेबल आणि सैनिकी मतदार यांच्या मतपत्रिकांसाठी एकूण ३ टेबलद्वारे करण्यात आली. एकूण २९ टेबलांद्वारे सकाळी आठ वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरु करण्यात आली. आणि ती नुकतीच पूर्ण करण्यात आली आहे.

वाई विधानसभा मतदार संघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाचे नेते आणि विद्यमान आमदार मकरंद पाटील उभे असून त्यांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने अरुणादेवी पिसाळ यांनी निवडणूक लढवली. तर अपक्ष म्हणून पुरुषोत्तम जाधव हे देखील निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, या दोघांनाही मकरंद पाटील यांचा विजय थांबवता आला नाही. अरुणादेवी पिसाळ या कै. मदनराव पिसाळ यांच्या सून असून मकरंद आबांपुढे त्यांनी कडवं आव्हान केले होते. तसेच शेवटच्या टप्प्यात खासदार शरद पवार यांनी देखील सभा घेत मकरंद पाटील यांना पाडा पाडा पाडाच असे म्हंटले होते. मात्र, सर्वसामान्य मतदार बांधवांनी पुन्हा एकदा मकरंद आबा यांनाच निवडून दिले.