झाडाणी प्रकरणात शिंदेंनी केलेले आरोप मकरंद पाटलांनी फेटाळले; म्हणाले की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | युवक काॅंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी पत्रकार परिषदेत आमदार मकरंद पाटील यांच्यावर झाडाणी येथील प्रकरणात आरोप केले. त्यांच्या आरोपानंतर आमदार पाटील यांनी प्रसिध्दीपत्रक काढत केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. सालोशीतील वळवीवस्तीवर विद्युतीकरण काम जिल्हा नियोजन आराखड्यांतर्गत उपसरंपच विठ्ठल मोरे आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार मंजूर केले होते. याप्रकरणी कोणीही दोषी असल्यास कारवाई करावी. माझे कोणाशीही आणि कसलेही हितसंबंध गुंतलेले नाहीत, असे स्पष्टीकरण आ. मकरंद पाटील यांनी दिले आहे.

या पत्रकात आमदार पाटील यांनी म्हटले आहे की, मी फक्त जनतेच्या हिताचा विचार करुन कामे करीत असल्यामुळे कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी आहे. महाबळेश्वर तालुक्यातील सालोशीतील वळवीवस्तीवर विद्युतीकरण काम मंजूर केले. कारण, ट्रान्सफाॅर्मर बसविल्यास आजुबाजुच्या गावातील लोकांचा विजेचा आणि पाण्याचा प्रशन सुटण्यास मदत होणार आहे. संबंधित पत्र हे विद्युतीकरणासाठी दिलेले होते. यामध्ये मी याकामासाठी किती रक्कम लागणार हे नमुद केले नव्हते. त्याबाबतचे अंदापत्रक हे संबंधीत अधिकाऱ्यांनी करावयाचे असते. यामधून कोणा एका व्यक्तीचा फायदा व्हावा असा कोणताही हेतू नव्हता. चंद्रकांत वळवी या इसमाशीही माझा कोणताही संबंध नाही.

माझ्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन कोणीतरी बेछुट आरोप केले आहेत. वास्तविक विविध कामासांठी त्या-त्या भागातील कार्यकर्ते विविध प्रश्न आणि कामासाठी शिफारस पत्र मागतात. लोकांच्या अडचणी सोडविण्याच्या उद्देशाने अशी पत्रे दिली जातात. लोकांचे प्रश्न तत्काळ सुटावेत असा हेतू त्यापाठीमागे असतो. माझ्या मतदारसंघात अनेक छोट्या लोकवस्तीची गावे आहेत. तेथील कार्यकर्ते नेहमीच विकासकामासाठी पाठपुरावा करत असतात.

कार्यकर्त्याच्या मागणीनुसार अशी पत्रे देत असतो. त्यातून झालेल्या विकासकामाचा फायदा किंवा गैरफायदा कोणी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष घेत असेलतर त्याची माहिती प्रशासनाने घेतली पाहीजे. जे चुकीचे असेल ते नाकारण्याचा अधिकार प्रशासनाला आहे. त्यामुळे चुकीचे काही घडले असल्यास प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असे आमदार पाटील यांनी म्हंटले आहे.