सातारा प्रतिनिधी | पुणे – सातारा महामार्गावरील असलेल्या खंबाटकी घाटात नेहमीच वाहतूक कोंडीची समस्या जाणवत असते. दरम्यान, आज सकाळी पुण्यावरून साताऱ्याकडे जाण्यासाठी निघालेल्या वाहनांमुळे खंबाटकी घाट (Khambatki Ghat) पुन्हा एकदा जाम झाल्याची घटना घडली. या वळणदार घाट मार्गावर सुमारे ४ ते ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. घाट मार्गात वाहने बंद पडल्यामुळे खंबाटकी घाट जाम झाल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागला.
गेल्या काही दिवसांपासून पुणे सातारा मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. अशात घाटात दाट धुके पडत असल्याने वाहने देखील धीम्या गतीने सुरू आहेत. याशिवाय, विकेंडमुळे देखील या मार्गावर कोंडी निर्माण होऊ लागल्यामुळे वाहनधारकांना या कोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दोन्ही बाजूंनी कोंडी होत असल्याने वाहनधारक पर्यायी मार्गाचा अवलंब करताना दिसत आहेत.
आज नाताळाची शासकीय सुट्टी असल्याने खंबाटकी घाटात वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. यातच घाटातील दत्त मंदिराजवळ चार ते पाच वाहने बंद पडल्याने आज सकाळी ४ ते ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यावेळी महामार्ग पोलीस व खंडाळा पोलिसांनी वाहनांची कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहनांची संख्या अधिक असल्याने दोन ते तीन तास हा घाट जाम राहिला.