सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी (ता. खटाव) येथे झालेल्या दंगलीतील फरारी असलेल्या मुख्य संशयिताच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. दंगलीच्या घटनेला आठ दिवसांनी वर्ष पूर्ण होत आहे. त्यापूर्वी पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे.
सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी गावात गतवर्षी झालेल्या दंगल आणि हत्येप्रकरणी फरारी असलेल्या मुख्य संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. नितीन महादेव वीर, असं त्याचं नाव असून वडूज न्यायालयाने त्याला बुधवारपर्यंत (४ सप्टेंबर) पोलीस कोठडी दिली आहे.
अटकपूर्व जामीनावरील सुनावणीदिवशीच अटक
पुसेसावळी दंगलीच्या घटनेतील मुख्य संशयित नितीन महादेव वीर याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर २४ तारखा झाल्या आहेत. दि. २ सप्टेंबर रोजी जामीन अर्जावर पुन्हा सुनावणी ठेवण्यात आली होती. मात्र, एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांच्या पथकाने मुख्य फरारी संशयिताला सुनावणी दिवशीच घराच्या परिसरात सापळा रचून पकडले.
वादग्रस्त पोस्टवरून उसळली होती दंगल
सोशल मीडियावर महापुरूषांबद्दल टाकण्यात आलेल्या वादग्रस्त पोस्टवरून खटाव तालुक्यातील पुसेसावळी गावात ११ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री दंगल उसळली होती. जमावाने प्रार्थनास्थळावर हल्ला करून ११ जणांना बेदम मारहाण केली होती. वाहनांची जाळपोळ आणि घरे, दुकानांची तोडफोड करण्यात आली होती. त्यात नूरहसन शिकलगार नावाच्या विवाहित तरूणाचा मृत्यू झाला होता. घटनेमुळे जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.
वर्षभरापासून पुसेसावळीत पोलीस बंदोबस्त
दंगल आणि तरुणाच्या हत्येनंतर संपूर्ण राज्यात पुसेसावळी घटनेचे पडसाद उमटले होते. त्यामुळे अनेक दिवस पुसेसावळीला पोलीस छावणीचे स्वरूप होते. तणाव निवळल्यानंतर आणि परिस्थिती पूर्वपदावर असल्यानंतर बंदोबस्तावरील पोलिसांची संख्या कमी करण्यात आली. परंतु, संपूर्ण बंदोबस्त हटवला नाही. गेली वर्षभर पुसेसावळीत पोलीस तैनात आहेत.