सातारा प्रतिनिधी | विधान निवडणुकीच्या तोंडावर कोरेगाव विधानसभा मतदार संघात आरोप-प्रत्यारोप शिगेला पोहचले आहेत. कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी शरद पवार गटाचे विधान परिषद आमदार शशिकांत शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत.
कोरेगावचे आमदार पोलिसांना हाताशी धरून सुडबुध्दीने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तडीपार करायला लावत असल्याचा आरोप आ. शशिकांत शिंदे यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना ‘आमदार शशिकांत शिंदे हे शेतकऱ्यांचे पैसे खाऊन फरार झालेले गुन्हेगार आहेत. स्वतःला माथाडी कामगार भासवून आणि ७२ हजारापेक्षा कमी पगार दाखवून त्यांनी वाशीमध्ये ६ कोटीचे घर घेतलं आहे’, असा गंभीर आरोप कृष्णा खोरेचे उपाध्यक्ष तथा आमदार महेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला.
शशिकांत शिंदे फरार गुन्हेगार
राज्य शासनाच्या जमिनीत आ. शशिकांत शिंदे यांनी मोठा अपहार केला आहे. नवी मुंबई मार्केट कमिटीतील ६७ गाळे कुटुंबीयांच्या नावावर घेतले आहेत. ते आजही फरार गुन्हेगार आहेत. त्यांना जामीन मिळालेला नाही. शेतकऱ्याचे लाटलेले ६७ गाळे त्यांन परत दिले पाहिजेत. स्वतःला माथाडी कामगार भासवून आणि स्वतःचा पगार ७२ हजारांपेक्षा कमी दाखवून खोट्या प्रतिज्ञापत्रावर त्यांनी वाशीमध्ये ६ कोटींचे घर घेतलं असल्याचंही आमदार महेश शिंदे यांनी सांगितलं.
शशिकांत शिंदेंनी गुंडांची फॅक्टरी तयार केली
आमदार शशिकांत शिंदे यांनी स्वतःची राजकीय कारकिर्द समाजातील तरुणांना गुंडगिरीकडे नेण्यात घालवली आहे. कोरेगावात त्यांनी गुंडांची फॅक्टरी तयार केली. प्रतापसिंहनगरमध्ये गुंडगिरी बोकाळली. ज्यांच्यावर २००९ ते २०१४ या दरम्यान गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली असल्याचं आ. महेश शिंदे यांनी स्पष्ट केलं.
आम्ही सगळेच जरांगेंच्या भुमिकेशी सहमत
मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे-पाटील हे माझ्याविरोधात ‘फॅक्टर’ उभे करतील, असे मला वाटत नाही. आम्ही सगळे त्यांच्या भूमिकेशी काही अंशी सहमतही असतो. ते मराठा चळवळीचे मोठे नेते आहे. माझ्यासारख्या छोट्या कार्यकत्याविरोधात ते काही करतील, असे वाटत नसल्याचे स्पष्टीकरणही आ. महेश शिंदेंनी दिले.