सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाव न घेता आज निशाणा साधला आहे. “दहावा आणि तेराव्याच्या कार्यक्रमांना असे अनेक कावळे फिरतात. त्याने काही फरक पडत नाही. ते फक्त प्रसाद उचलतात अन् निघून जातात,” अशी टीका आमदार शिंदे यांनी केली.
आमदार शिंदे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी इंडिया आघाडीचे सरकार येण्याबाबत भाष्य केले होते. मात्र त्यांनी काही ही सांगितले तरी जिहे कटापूर योजना दीड वर्षांपूर्वीच पूर्ण होवून तिचे पाणी सर्वत्र पोहचले आहे.
आता विस्तारी जिहे कटापूर योजना करायची आहे. मात्र या योजनेच्या पूर्ण नावाचा उल्लेख शरद पवार यांनी टाळला. नरेंद्र मोदी यांचे गुरु लक्षमणराव इनामदार उपसा सिंचन जिहे कटापूर योजना असे या योजनेस नाव आहे. केंद्र सरकारने पंतप्रधान सिंचाई योजनेत या योजनेचा समावेश केला आहे. हे शरद पवार यांना माहीत नाही? ही दुर्दैवाची गोष्ट आहे, अशी टीका आ. शिंदे यांनी केली आहे.