सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभेसाठी भ्रष्टाचारी उमेदवार दिल्याने यशवंत विचारांवर बोलण्याचा शरद पवारांना अधिकार नाही, शरद पवारांना यशवंत विचारांचा विसर पडला आहे, अशी घणाघाती टीका कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी केली आहे.
सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू असून निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान झाले आहे. तर पुढील टप्प्यांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर खोचली आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षामधील नेते आरोप-प्रत्यारोप करत आहेत. या दरम्यान, आज कोरेगावच्या आमदार महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांच्यासह शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
दरम्यान, महेश शिंदे यांनी म्हटले आहे की, शरद पवारांना यशवंत विचारांचा विसर पडला आहे त्यामुळे यशवंत विचारांवर बोलण्याचा शरद पवारांना अधिकारच नाही. सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून शशिकांत उमेदवारी देण्यात आली आहे, मात्र अशा भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या व्यक्तीला शरद पवारांनी उमेदवारी दिल्याने पवारांना यशवंत विचाराचा विसर पडल्याचे दिसत आहे.