सातारा प्रतिनिधी | लोकसभेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या दरम्यान, सातारा जिल्ह्यातील महायुतीमधील नेत्यांची महत्वाची बैठक काल साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात पार पडली. यामध्ये उद्या साताऱ्यात होणाऱ्या महामेळाव्याचे ठिकाण ठरविण्यात आले.
बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत सातारा आणि माढा मतदारसंघात महायुतीचाच खासदार निवडून आणण्याचा निर्धार करत एकप्रकारे युतीने निवडणुकीचे रणशिंगही फुंकले.
सातारा शहरात उद्या दि. १४ जानेवारी रोजी महायुतीचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या तयारीसाठी महायुतीतील घटकपक्षांची बैठक शासकीय विश्रामगृहाt काल पार पडली. या बैठकीला पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी आमदार डाॅ. दिलीप येळगावकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, दीपक चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, राष्ट्रवादी (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम जाधव, रिपाइं (आठवले गट) जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड तसेच भाजपचे विक्रम पावसकर, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील, माजी कृषी सभापती शिवाजीराव शिंदे, भीमराव पाटील यांच्यासह घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीनंतर युतीतील नेत्यांनी पत्रकार परिषद घेत साताऱ्यातील गांधी मैदानावर दि. १४ जानेवारी रोजी दुपारी चारला महायुतीचा महामेळावा होणार असल्याचे जाहीर केले. राज्यात लोकसभेला ४५ पेक्षा अधिक खासदार निवडूण आणले जाणार आहेत. तसेच सातारा आणि माढ्याचा खासदारीही महायुतीचा करणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. राज्यपातळीवर महायुतीत एकी आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील गावागावांतही एकी दाखवून देऊ असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. तसेच लोकसभेला उमेदवार कोण असणार हे महत्वाचे नाही. यापेक्षा राज्यस्तरावरील बैठकीत उमेदवार निश्चित होईल, त्या आदेशाप्रमाणे निवडणुकीत काम केले जाईल, असेही यावेळी जाहीर करण्यात आले.