सातारा प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला उत्साहात सुरूवात झाली आहे. सातारा लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले आणि महाविकास आघाडीचे (शरद पवार गट) उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्यात हाय व्होल्टेज लढत होत आहे. या लढतीकडे राज्याचं लक्ष लागून आहे. दरम्यान, खा. उदयनराजे भोसले यांच्यासह त्यांच्या मातोश्री राजमाता कल्पनाराजे भोसले, पत्नी दमयंतीराजे भोसले यांनी सकाळी ७ वाजून ७ मिनिटांनी अनंत इंग्लिश स्कूलमधील मतदान केंद्रावर मतदान केलं.
भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी देखील कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक गावात मतदानाचा हक्क बजावला. संपूर्ण सातारा जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानाला सुरूवात झाली आहे. ज्येष्ठ नागरीक मतदानासाठी सकाळीच घराबाहेर पडल्याचे चित्र पाहायला मिळतंय. त्यामुळे मतदान केंद्रांवर चांगलीच गर्दी दिसत आहे.
दरम्यान, सातारा जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात १०० युनिक मतदान केंद्र बनवली आहेत. या आकर्षक मतदान केंद्रांमध्ये मतदार मतदानानंतर सेल्फी घेत आहेत. साताऱ्यातील गोडोली उपनगरातील बांबूची सजावट करण्यात आलेलं मतदान केंद्र लक्ष्यवेधी ठरतंय.