सातारा प्रतिनिधी । सध्या मार्च महिना असून ‘मार्च एन्ड’ च्या अनुषंगाने अतिरिक्त वीज वापरलेल्या आणि वीजबिल न भरलेल्या वीजग्राहकांकडून वीजबिलांची थकबाकीची वसुलीची मोहीम साताऱ्यात वीज महावितरणकडून सुरु आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणच्या भरारी पथकाने सातारा शहरातील थकबाकीदारांवरील कारवाई तीव्र केली असून, पथकाकडून मंगळवारी एकाच दिवसात १५० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
महावितरणला सातारा शहरातील १ लाख ९ हजार घरगुती ग्राहकांकडून थकबाकीपोटी तब्बल ७ कोटी ५९ लाख १५ हजार रुपये वसूल करावयाचे आहेत. या वसुलीसाठी महावितरणकडून थेट वीज कनेक्शन बंद करत धडक मोहीम राबविली जात आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे अकरा दिवस उरले असून, महावितरणला १ लाख ९ हजार घरगुती ग्राहकांकडून थकबाकीपोटी तब्बल ७ कोटी ५९ लाख १५ हजार रुपये वसूल करावयाचे आहेत. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी महावितरणने वसुली मोहिमेला गती दिली आहे. दरम्यान, वायरमेनकडून सूचना करून देखील वीजबिल न भरणाऱ्या
थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे.
कारवाईसाठी सात पथक तैनात
साताऱ्यात थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरणकडून सातारा शहरातील पाच विभागांसाठी सात भरारी पथकांची नेमणूक केली आहे. या पथकाकडून दिवसभर थकीत असलेल्या वीज बिलग्राहकांच्या प्रत्येक्ष भेटी घेत त्यांच्याकडून तत्काळ वीजबिले भरून घेतली जात आहेत. तसेच वीजबिल न भरल्यास तत्काळ वीज कनेक्शन तोडले जात आहे.
साताऱ्यातील ‘या’ भागात केली कारवाई
साताऱ्यात या भरारी पथकांकडून मंगळवारी दिवसभरात माची पेठ, फुटका तलाव, केसरकर पेठ, शनिवार पेठ, गुरुवार पेठ तसेच सोमवार पेठेतील एकूण १५० घरगुती थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. या कारवाईनंतर काही ग्राहकांनी तातडीने थकबाकी भरून वीजजोडणी पूर्ववत केली. दि. १ ते १९ मार्च या कालावधीत महावितरणने शहरातील तब्बल ८०० थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. ग्राहकांनी चालू वीजबिल व थकबाकी वेळेत भरावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.