सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीपुरतेच शेतकऱ्यांविषयी पुळका आणणाऱ्या महायुती सरकारचे धोरण आता स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांवर अन्याय करणाऱ्या महायुती सरकारला जाब विचारण्यासाठी सोमवार, दि. ७ रोजी सकाळी अकरा वाजता कोरेगावात महाविकास आघाडीच्यावतीने प्रांताधिकारी कार्यालयावर शेतकरी मोर्चा काढण्यात येणार आहे.
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची दिशाभूल करत कर्जमाफी करण्याची ग्वाही दिली होती, शेतकऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची मते मिळवत निवडणुकीत अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाल्यानंतर सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. कर्जमाफी विषयावर सरकारमधील मंत्री वेगवेगळी भूमिका जाहीर करत आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे देखील राज्याची आर्थिक परिस्थिती सध्या चांगली नसल्याने शेतकरी कर्जमाफी करू शकत नाही, असे स्पष्ट सांगत आहेत एकूणच या सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शेतकऱ्यांना नवीन वीज कनेक्शन मिळत नाही. महावितरण कंपनीचे अभियंते सौरऊर्जा कनेक्शन घेण्यासाठी दबाव आणत आहेत. धोम डाव्या कालव्याचे पाणी कोरेगाव तालुक्यासाठी वरदान असताना देखील केवळ राजकारणापायी हे पाणी अन्य ठिकाणी वळवले जात आहे. सध्या तालुक्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत असून नियमानुसार धोम धरणातून पाण्याचे रोटेशन द्यावे, या मागणीसह गायरान जमिनीवर उभारण्यात येणारे बेकायदेशीर सौर ऊर्जा प्रकल्प रोखण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होणार आहेत. कोरेगाव तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांनी या मोर्चात सहभागी होऊन महायुती सरकारला जाब विचारावा, असे आवाहन करण्यात आले आहे.