कराड प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष ॲड. महादेवराव साळुंखे यांनी कराड उत्तर मधून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या बंडखोरीमुळे भाजपाचे उमेदवार मनोज घोरपडे यांचं टेन्शन वाढलं आहे. याशिवाय मूळ कराड उत्तर मधील रवींद्र सूर्यवंशी (अजित पवार गट), सोमनाथ चव्हाण आणि संतोष वेताळ यांनी देखील अपक्ष अर्ज दाखल केले आहेत.
कराड उत्तरच्या उमेदवारीसाठी महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात रस्सीखेच चालली होती. विद्यमान आमदार हा राष्ट्रवादीतून निवडून आला असल्याने अजित पवार गटाने कराड उत्तरच्या जागेवर दावा केला होता, मात्र कराड उत्तरची जागा भाजपकडे गेली. भाजपने मनोज घोरपडे यांना मंगळवारी दुपारी एबी फॉर्म दिला. दरम्यान भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम हे देखील उमेदवारीच्या शर्यतीत होते. मात्र लॉबिंगमध्ये ते कमी पडले आणि उमेदवारी घोरपडेंकडे गेली.
कराड उत्तर भाजपमध्ये आता दोन गट पडले आहेत. त्यातील एका गटाचा मनोज घोरपडेंच्या उमेदवारीला आधीपासूनच सुप्त विरोध होता. महायुतीने घोरपडेंनाच उमेदवारी दिल्याने सुप्त विरोध आता उघड होऊ लागला आहे. निष्ठावंतांना डावलल्याची भावना भाजपमध्ये निर्माण झाली आहे. ॲड. महादेवराव साळुंखे यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्यानंतर कराड उत्तरच्या भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे. बंडखोरीमुळे भाजपच्या गोटात चलविचल सुरू झाली आहे. कराड उत्तरमध्ये अजित पवार यांचे नेतृत्व म्हणणाऱ्या रवींद्र सूर्यवंशी यांनी अर्ज दाखल केल्यामुळे महायुतीला आणखीनच झटका बसला आहे.
कराड उत्तरमधील बंडखोरी पाहता महायुतीचं टेन्शन चांगलंच वाढलं आहे. पक्षांतर्गत झालेली बंडाळी दूर करण्यात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना यश येणार का? महायुतीच्या अधिकृत उमेदवाराला होत असलेला विरोध मावळणार का? याकडे कराड उत्तरमधील महायुतीच्या वर्तुळाचं लक्ष लागून आहे.