सातारा प्रतिनिधी । खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे काल क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील इतर नेत्यांनी देखील उपस्थिती लावली होती. यावेळी रासपचे अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनी देखील उपस्थित राहून अभिवादन केले. यावेळी त्यांनी ओबीसी समाजात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या प्रश्नावर प्रत्युत्तर दिले. माजी उपमुख्यमंत्री भुजबळ यांनी मोठी जागृती केली आहे. ते मोठे नेते आहेत. त्यांना सल्ला देणे बरोबर नाही. पण, दुसऱ्याच्या घरात राहण्यापेक्षा स्वत:ची झोपडी, घर असणे आवश्यक आहे, असे माजी मंत्री महादेवराव जानकर यांनी म्हणत प्रत्युत्तर दिले.
नायगाव, ता. खंडाळा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त स्मारकस्थळी अभिवादन केल्यानंतर माजी मंत्री जानकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक परिवर्तनाचे अजोड काम केले आहे. नायगाव येथे अभिवादन करून आम्ही प्रेरणा घेतो.
भाजप आणि काँग्रेसमध्येही काहीही फरक नाही. त्यामुळे मी महायुती किंवा आघाडीबरोबरही नाही. स्वत:ची ताकद निर्माण करून स्वत:चे राज्य आणणार आहे. एक दिवस फुले विचारांचाच मुख्यमंत्री आम्ही करू. आता दिल्ली आणि बिहार राज्यातही विधानसभा निवडणूक लढवत आहे. महाराष्ट्रात माझा एक आमदार असून, तिघे जण थोडक्या मतांनी पराभूत झाले असल्याचे जानकर यांनी म्हटले.