सातारा प्रतिनिधी । लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून मॅरेथॉन बैठकींचे सत्र देखील सुरू झाले आहे. दरम्यान, पुण्यात आज महायुतीची एक महत्त्वाची बैठक पार पडत असून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यासह महायुतीतील सर्वच घटक पक्ष या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मात्र, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना या बैठकीचे निमंत्रणच देण्यात आलेले नसल्यामुळे जानकर वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
माढा लोकसभा मतदार संघात रासपचे महादेव जानकर यांची मोठी ताकद आहे. माढाच मतदार संघ नाही तर त्यांनी राज्यभर, देशभरात आपली लोकप्रियता मिळवली आहे. महादेव जानकर यांच्या पाठीशी धनगर समाजाची मोठी ताकद असल्याने बारामती आणि माढा अशा दोन्ही ठिकाणी या मतदारांचा जानकरांना लोकसभा निवडणुकीत चांगला फायदा होऊ शकतो. जानकरांशी युती केल्यामुळे बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी धनगर समाज उभा राहिल्यास त्यांचा विजय सोपा होईल हे नक्की. तसेच महादेव जानकरांनी माढ्याची जागा जिंकल्यास महाविकास आघाडीच्या आणखी एका जागेत वाढ होऊ शकते.
जानकर महायुतीत नाराज…
गेल्या अनेक दिवसांपासून महादेव जानकर हे महायुतीमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. भाजप हा छोट्या घटक पक्षांवर अन्याय करत असल्याची भावना व्यक्त करत महादेव जानकर हे वेगळ्या विचार करण्याच्या तयारीत दिसत आहेत. महादेव जानकर यांनी महाविकास आघाडी सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं आता जवळपास स्पष्ट झालं आहे.
पवारांच्या निर्णयाचं जानकरांकडून स्वागत
माढा लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर हे स्वतः इच्छुक आहेत. आता माढा लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या कोट्यातून महादेव जानकर यांच्या रासपाला सोडण्याची तयारी स्वतः शरद पवार यांनी दर्शवली आहे. शरद पवार यांच्या या निर्णयाचे महादेव जानकर यांनी देखील स्वागत केलं आहे. रासपचे महादेव जानकर सोबत आले तर त्यांचे देखील स्वागत आहे. त्यांना माढा लोकसभा मतदारसंघ देण्याची माझी तयारी आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत. शरद पवारांच्या या निर्णयाचे स्वागत स्वतः महादेव जानकर यांनी केला आहे. ते म्हणाले शरद पवार यांच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो पण आता महाविकास आघाडी मधून शिवसेना आणि काँग्रेस आपल्याला कोणती जागा देते हे पाहणं महत्त्वाचं आहे.