सातारा प्रतिनिधी | राज्यात आगामी काळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष मोर्चेबांधणीसाठी तयारीला लागले आहेत. यात राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर हे देखील आता तयारीला लागले असून त्यांनी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याच्या सुरवडी गावात राष्ट्रीय समाज पक्षाच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी संघटनात्मक बांधणीसाठी नुकतीच एक बैठक देखील घेतली तसेच बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसह जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीबाबत चर्चा केली.
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी सुरवडी गावचे सुपुत्र व पक्षाचे कट्टर समर्थक विशाल बापू माडकर यांच्या निवासस्थानी नुकतीच बैठक घेतली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते होते तर सुरवडी गावच्या ग्रामस्थांसह मराठा, धनगर, माळी, मागासवर्गीय व बहुजन समाजातील कार्यकर्ते देखील बैठकीस उपस्थित होते.
यावेळी जानकर यांनी बैठकीत स्थानिक नेतृत्वाच्या सहभागाने पक्षाच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावण्याच्या संधीवर चर्चा केली. नुकत्याच घेतलेल्या बैठकीमुळे फलटण तालुक्यात राष्ट्रीय समाज पक्षाने संघटनात्मक मजबुतीसाठी मोर्चेबांधणी केली असून, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी पक्षाकडून ताकदीने लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.