राज्यात सध्या राजकीय रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सर्वंच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अनेकांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. सर्व राजकीय नेत्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. अशातचं आता राष्ट्रीय समाज पक्षाची पहिली यादी जाहीर केली आहे. महादेव जानकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील सातारा आणि कराड उत्तर या दोन विधानसभा मतदार संघात उमेदवार दिलेले आहेत.
महादेव जानकर यांनी गंगाखेडमधून रत्नाकार गुट्टे तर अहमदपूर मतदार संघातून बब्रुवान खंदाडे यांच्यांसह 65 जणांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यात सातारा विधानसभा मतदार संघात शिवाजी भगवान माने आणि कराड उत्तरमधून सोमनाथ रमेश चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे.
रासपने पहिल्याच यादीत 65 जणांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे येत्या काळात माजी मंत्री महादेव जानकर आणखी किती उमेदवारांची घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महादेव जानकर महायुतीतून बाहेर
राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. महादेव जानकर यांचा पक्ष आता राज्यात स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे आणखी उमेदवारांची नावे घोषित करणार आहेत. महादेव जानकरांनी लोकसभा निवडणूक ही महायुतीच्या माध्यमातून लढवली होती. मात्र परभणीतून त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर विधानसभेला आपल्या पक्षाला सन्मानजनक जागा मिळाव्यात यासाठी जानकर प्रयत्नशील होते. पण त्यांना अपेक्षित जागा मिळणार नाही असं लक्षात येताच त्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.