सातारा प्रतिनिधी । रयतेच्या स्वराज्याचे संस्थापक, हिंदवी साम्राज्याचे प्रवर्तक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने दि. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 6.45 वाजता, सातारा शिवतीर्थावरील शिवप्रभुंच्या पूर्णाकृती पुतळ्याला दुग्धाभिषेक आयोजन करण्यात आले आहे. याचवेळी तेथे उभारण्यात आलेल्या शिवस्वराज्य प्रेरणा देणाऱ्या 100 फुट उंचीच्या भगव्या ध्वजाचे उद्घाटन, अनावरण नक्षत्रच्या संस्थापिका अध्यक्षा सौ. दमयंतीराजे भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. या ठिकाणाची खासदार उदयनराजे भोसले यांनी काल पाहणी केली आहे.
यावेळी सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस प्रमुख समीर शेख, जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या सोहळ्यास तमाम शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेच्या राज्याव्दारे सर्वप्रथम लोकशाहीचा पाया रचला.
छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या स्वराज्याची प्रेरणा आणि अनुभुती समाजाला अखंड होण्यासाठी शिवतीर्थावर 100 फुट उंचीचा चिरंतन प्रेरणादायी भगव्या ध्वजाची उभारणी करण्यात आली आहे. या सोहळ्यास जिल्हाप्रशासनातील अन्य मान्यवर देखिल उपस्थित राहणार आहेत. शिवप्रभुंच्या अजोड कार्याला कृतज्ञतापूर्वक विनम्र अभिवादन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या अभिषेक तसेच 100 फुट उंचीच्या भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण सोहळयास सर्व शिवप्रेमी सातारकर नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.