महाबळेश्वरचा पारा पुन्हा घसरला; सातारा शहरात झाली ‘इतक्या’ अंश सेल्सीअसची नोंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । जिल्ह्यातील किमान तापमानात आणखी उतार आला असून, गुरुवारी देखील सातारा शहरात १२, तर महाबळेश्वरला ११ ते अंशापर्यंत पारा खाली आला होता. शुक्रवारी महाबळेश्वरात १०.५, तर सातारा शहरात १२ अंशाची नोंद झाली हे या हंगामातील आतापर्यंतचे नीचांकी तापमान ठरले आहे. पारा खालावल्याने जिल्ह्यातील गारठ्यात चांगलीच वाढ झाल्याने जनजीवनावर परिणाम झाला आहे.

जिल्ह्याचा पारा घसरल्याने ग्रामीण भागातही थंडीची लाट आहे. यामुळे शेतीच्या कामावर परिणाम झाला आहे. शेतकरीवर्ग दुपारच्या सुमारास शेतीची कामे उरकत आहे. तसेच शहरातील बाजारपेठेतही सायंकाळच्या सुमारास गर्दी जाणवत नाही. थंडीची तीव्रता पाहता आणखी काही दिवस गारठा कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्ह्यात दरवर्षी डिसेंबर महिन्यात कडाक्याची थंडी पडते. साधारणपणे डिसेंबरचा मध्य ते जानेवारीची सुरुवात यादरम्यान पारा एकदम खाली येतो. पण, यंदा नोव्हेंबर महिन्यातच कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे मागील १५ दिवसांत थंडीचे प्रमाण वाढले आहे. त्यातच सध्या दररोज पारा घसरत चालला आहे. त्यामुळे चार दिवसांत किमान तापमानात दोन अंशाचा उतार आला आहे.

सातारा शहरात थंडीचे प्रमाण वाढले आहे. गुरुवारी १२.५ अंश किमान तापमानाची नोंद झाली होती. पण, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास शहरात १२ अंशाची नोंद झाली. त्यातच वातावरणात शीतलहर आहे. त्यामुळे अंगाला थंडी झोंबत असल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर महाबळेश्वरचा पाराही घसरला आहे. शुक्रवारी १०.५ अंशाची नोंद झाली. हे या हंगामातील नीचांकी तापमान ठरले. आणखी दोन दिवस तापमानात उतार राहिला तर महाबळेश्वरात दवबिंदू गोठण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सातारा जिल्ह्याच्या अनेक भागातील किमान तापमान १३ अंशाच्या दरम्यान आहे. यामुळे थंडीत वाढ झाली आहे. सायंकाळी सहानंतरच थंडीला सुरुवात होते. रात्रभर थंडीची तीव्रता जाणवते, तर पहाटेच्या सुमारास थंडीचा कडाका पडत आहे. यामुळे सकाळी १०:०० वाजले तरी अंगातून थंडी जात नाही. तसेच दुपारच्या सुमारासही वाऱ्यामुळे थंडीची तीव्रता अधिक जाणवते. या थंडीमुळे बाजारपेठ तसेच शेतीच्या कामावर परिणाम झाला आहे. थंडीमुळे गावोगावी आणि शहरातही शेकोट्या पेटविण्यात येत आहेत.

महाबळेश्वर शहराचे किमान तापमान

दि. २० नोव्हेंबर १३.२, २१ नोव्हेंबर १२.५, २२ नोव्हेंबर १४, २३ नोव्हेंबर १३.८, २४ नोव्हेंबर १३.९, २५ नोव्हेंबर १२, २६ नोव्हेंबर १२.६, २७ नोव्हेंबर ११.८, २८ नोव्हेंबर ११.५ आणि २९ नोव्हेंबर १०.५