महाबळेश्वरची लालचुटूक स्ट्रॉबेरी झळकली टपाल कॅन्सलेशनवर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरच्या लालचुटूक स्ट्रॉबेरीचे छायाचित्र विशेष शाश्वत चित्रात्मक टपाल कॅन्सलेशनवर झळकले आहे. मुंबई येथील टपाल कार्यालयात सोमवारी पार पडलेल्या एका कार्यक्रमात या कॅन्सलेशनचे अनावरण करण्यात आल्याने महाबळेश्वरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

ब्रिटिश काळापासून महाबळेश्वरात स्ट्रॉबेरीची शेती केली जात आहे. पारंपरिक शेतीला तंत्रज्ञानाची जोड दिली गेली. हायड्रोपोनिक तंत्रज्ञान विकसित झाले. मातीविना शेती हा प्रयोगही येथे राबविण्यात आला. तालुक्यातील दोन हजारांहून अधिक शेतकरी सध्या स्ट्रॉबेरीची शेती करत आहेत. भारतात स्ट्रॉबेरीचे सर्वाधिक ८५ टक्के उत्पादन एकट्या महाबळेश्वर तालुक्यात घेतले जाते. या स्ट्रॉबेरीची जागतिकस्तरावर असलेली लोकप्रियता आणि महत्त्व लक्षात घेऊन टपाल विभागाकडून स्ट्रॉबेरीचा विशेष सन्मान करण्यात आला.

मुंबई टपाल कार्यालयात सोमवारी झालेल्या सोहळ्यात स्ट्रॉबेरीचे छायाचित्र असलेल्या विशेष टपाल कॅन्सलेशनचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्याला डाक विभागाच्या सचिव वंदिता कौल, महाराष्ट्र आणि गोवा पोस्टल सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंग, मुंबई विभागाच्या पोस्टमास्टर जनरल सुचिता जोशी आदी उपस्थित होते.