सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला असून, धरण पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू आहे. महाबळेश्वर-तापोळा मुख्य रस्त्यावर महाबळेश्वरपासून 9 कि.मी. अंतरावर चिखली शेड परिसरात सोमवारी पहाटे दरड कोसळली. डोंगरावरून राडारोडा आणि मोठे दगड खाली आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.
सोमवारी महाबळेश्वरमध्ये दिवसभरात 45 मि. मी., तर सातार्यात 3.2 मि. मी. पावसाची नोंद झाली. सातारा शहरासह जिल्ह्यात सोमवारी पावसाचा जोर वाढला. महाबळेश्वर, वाई, सातारा, कराड, पाटण तालुक्यांत पावसाच्या सरी कोसळत आहेत. महाबळेश्वरच्या दुर्गम भागात पावसाने हजेरी लावली आहे. पावसाची रिपरिप सुरू असल्याने दरडी कोसळण्याचे प्रकार वाढू लागले आहे.
महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर सोमवारी पहाटे चिखली शेड परिसरात डोंगरावरील राडारोडा आणि मोठ मोठे दगड रस्त्यावर आले. बांधकाम विभागाने जेसीबीने तत्काळ ही दरड हटवली. पावसामुळे डोंगररांगातून छोटे-मोठे धबधबे खळाळू लागले आहेत. पश्चिम भागातील ओढ्या, नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
पश्चिम भागात पावसामुळे भात लागणीच्या कामांनी वेग घेतला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ग्रामीण भागात आडसाली ऊसाच्या लागणीची कामे सुरू झाली आहेत.