सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्राचे नंदनवन व पावसाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. महाबळेश्वर येथील पावसाने या हंगामातील ५० इंचाचा टप्पा आज पूर्ण केला. दि. १ जूनपासून कमी अधिक पाऊस बरसत आहे. महाबळेश्वर येथे आज ५४.९ मिमी पावसाची नोंद झाली. यावर्षी या हंगामातील एक महिन्यात पावसाने ५०.८०७ इंचाचा (१२९०.५० मिमी)टप्पा आज पार केला.
महाबळेश्वर, पाचगणी, वाई, जावळीत पावसाची संततधार सुरु आहे. महाबळेश्वर येथील पावसाने या हंगामातील ५० इंचाचा टप्पा आज पूर्ण केला. महाबळेश्वर येथे दाट धुके, थंड वातावरण अन् पावसाच्या सरी अंगावर झेलत पर्यटक वेण्णा लेक भरल्याने तलावात पर्यटक बोटींग करू लागले आहेत.
संपूर्ण जून महिन्यात कमी अधिक प्रमाणात पावसाची संततधार सुरू आहे. जुलैच्या सुरीवाती पासून पावसाने जोर धरल्याने महाबळेश्वर पाचगणी,सातारा तालुक्यातील व जावळी, वाईचा पश्चिम भाग,कास पठार परिसरातील नद्या, नाले, ओढे ओसंडून वाहू लागले आहेत. या पावसामुळे महाबळेश्वरची जीवनवाहिनी असलेला वेण्णालेक भरला आहे. तलाव पूर्णपणे भरल्याने पावसाळी हंगामात पर्यटक बोटींगचा आनंद घेऊ लागले आहे.