सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील दुकानदारांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या ठाणे येथील एका टोळीस महाबळेश्वर पोलिसांनी मंगळवारी दुपारी अटक केली. या टोळीतील तिघांच्याकडून एक दुचाकी, ५ मोबाइल, खरेदी केलेल्या वस्तू, असा सुमारे ४८ हजार ३५० रुपये असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सचिन राजू साळुंखे (वय २०, रा. कोकबन, ता. रोहा, जि. रायगड, सध्या रा. विश्वासनगर चाळ, लोकमान्यनगर वागळे इस्टेट, ठाणे), अमर अखिलेश पाल (रा. बरैछाबिर, गोबर, जि. जाैनपूर, उत्तर प्रदेश, सध्या रा. वागळे इस्टेट, ठाणे), प्रकाश तुकाराम डगळे (२१, रा. वारलीपाडा, श्रीनगर वागळे इस्टेट, ठाणे), अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, संशयित तिघे महाबळेश्वरात वस्तू खरेदी करण्याच्या बहाण्याने गुगल पे व फोन पेद्वारे दुकानदार तसेच व्यापाऱ्यांची फसवणूक करत होते. वस्तू खरेदी केल्यानंतर गुगल पेद्वारे बिलापेक्षा जादा रक्कम पाठवून एसएमएस दाखवायचे. उलट दुकानदारांकडून पैसे आणि वस्तूही खरेदी करायचे.
अशा प्रकारे भरत लक्ष्मण वरपे यांच्या दुकानातील चप्पल खरेदी करण्याच्या बहाण्याने २२५०, पांडुरंग खेळू भिलारे यांची स्ट्राॅबेरी खरेदी करण्याच्या बहाण्याने २००० तसेच अंकुश बाबजी सालेकर यांची सेल्फी स्टीक खरेदीच्या बहाण्याने २०००, जयवंत दत्तात्रय बिरामणे यांच्याकडून कॅप व गाॅगल खरेदीच्या बहाण्याने संशयितांनी पैसे उकळले. हे प्रकार सातत्याने घडू लागल्यानंतर दुकानदारांनी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी पाळत ठेवून तिघा संशयितांना मंगळवारी दुपारी अटक केली.