सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर वन विभागाने एका हॉटेलमधून मऊ पाठीचे कासव ताब्यात घेतले आहे. दुर्मिळ वन्यप्राणी हॉटेलमधील फिश टॅकमध्ये पाळल्याने वन विभागाने ही कारवाई केली. तसेच याप्रकरणी वन्यजीव अधिनियमान्वये हॉटेल मालक विजय बबन शिंदे (रा. हरचंदी-मोरेवाडी, ता. महाबळेश्वर) याच्यावर वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाबळेश्वर तापोळा मार्गावर असलेल्या निलमोहर अॅग्रो रिसॉर्टमधील फिश टॅकमध्ये भारतीय मउ पाठीचे कासव पाळले असल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार वन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हॉटेल निलमोहरमधून कासव ताब्यात घेतले. याप्रकरणी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ मधील कलमान्वये हॉटेल मालक विजय बबन शिंदे (रा. हरचंदी-मोरेवाडी, ता. महाबळेश्वर) यांच्यावर वन गुन्हा दाखल केला.
सातारा वन विभागाच्या उपवनसंरक्षक श्रीमती आदिती भारद्वाज, सहाय्यक वनसंरक्षक महेश झाजुर्ण यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वरचे वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश महांगडे, वनपाल सहदेव भिसे, वनरक्षक अभिनंदन सावंत, लहू राऊत, विलास वाघमारे, संदीप पाटोळे, रेश्मा कावळे, मीरा कुटे, श्रीनाथ गुळवे, विश्वंभर माळझळकर, तापोळ्याच्या वनपाल श्रीमती अर्चना शिंदे यांनी ही कारवाई केली. वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश महांगडे हे पुढील तपास करत आहेत.