मोटारीतून करत होते चंदनाची तस्करी, महाबळेश्वर वन विभागाने सापळा रचून तस्करांना पकडले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर वनविभागाने तापोळा महाबळेश्वर रस्त्यावर दोन चंदन तस्करांकडून चंदन जप्त केले. संशयितांच्या मोटारीची तपासणी करताना गाडीत चंदन आढळून आले. याप्रकरणी दोन चंदन तस्करांना वन विभागाने ताब्यात m घेतले आहे. अक्षय अर्जुन चव्हाण (वय २०, रा. फत्यापूर, ता. जि. सातारा) आणि आशिष विकास पवार (वय १६, रा. खतगुण, ता. खटाव), अशी त्यांची नावे आहेत.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तापोळा महाबळेश्वर मार्गावरील वानवली गावच्या हद्दीत एक चारचाकी मोटार (क्र. एम. एच. ०१ व्ही. ए. ४२५२) उभी होती. मोटारीचा संशय आल्याने मोटारीची तपासणी केली असता मोटारीत दोन इसम बसले होते. एका पिशवीमध्ये चंदनाच्या लाकडाचे तुकडे (वजन १७ किलो), एक बॅटरी, एक निगार्ड, एक कटर, तीन करवती, एक कुदळ, तीन मोबाईल आढळले.

मोटारीतील दोघेही चंदन तस्कर असल्याची खात्री पटताच त्यांना वन विभागाने ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडील साहित्य जप्त करण्यात आले. संशयित आरोपींविरुद्ध भारतीय वन अधिनियम, १९२७ चे कलम ४१(२) (ब) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. सातारा वन विभागाच्या उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज, सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वरचे वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश महांगडे, पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, उपनिरीक्षक रऊफ ईनामदार, तापोळ्याच्या वनपाल अर्चना शिंदे, वनरक्षक संदीप पाटोळे यांनी ही कारवाई केली. या घटनेचा तपास वनपाल अर्चना शिंदे करीत आहेत.