महाबळेश्वर प्रशासनाकडून जेसीबीद्वारे थापा पॉइंटवरील अतिक्रमणावर कारवाई

0
1

सातारा प्रतिनिधी । महाबळेश्वर तालुक्यातील दांडेघर येथील हॅरिसन्स फॉली (थापा) पॉइंट परिसरात तालुका प्रशासनाच्या वतीने नुकतीच अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. यावेळी प्रशासनाच्या वतीने जेसीबीद्वारे अतिक्रमण हटवण्यात आले. प्रशासनाच्या या कारवाईनंतर ग्रामस्थांच्या वाईटचे फटाके वाजवून व पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.

महाबळेश्वर तालुक्यातील दांडेघर येथील केदारेश्वर देवस्थानसमोरील जमीन (थापा पॉइंट सर्व्हे नं. १०) ही संपूर्ण पाचगणीमध्ये मोक्याची जागा असून, या ठिकाणी अनेक पर्यटक भेट देत असतात. सुहास वाकडे व वकील रविराज जोशी यांनी फेरफार करून वहिवाटदार म्हणून स्वतःचे नाव लावले. या १८ एकर जागेवर वाकडे यांनी गैरमार्गाने कब्जा केला आहे.

त्या विरुद्ध वाईचे प्रांताधिकारी यांनी २०१८ मध्ये जागा सील करण्याचे आदेश दिले होते. वकील जोशी यांनी उच्च न्यायालयाचे आदेश दाखवून पत्र्याचे शेड, बांधकामे केली होती. याबाबत महसूल मंत्र्यांकडे दावा प्रलंबित असताना सुद्धा गावाच्या मालकी असलेली जमीन स्वतःची असल्याचे भासवून अनेक लोकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार सुरू होता.

या गैरकारभाराविरुद्ध ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली. प्रशासन त्वरित ॲक्शन मोडवर आले असून, शनिवारी पहाटे दांडेघर गावची यात्रा असतानाच प्रशासन पाच जेसीबी, दोन क्रेन घेऊन जागेवर पोचले. अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. या ठिकाणावरील सर्व पत्र्यांचे शेड, बांधकामे पडण्यात आली. महाबळेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच महाबळेश्वर कोर्टाने पोलिस चौकशीचे आदेश दिले आहेत. प्रशासनाच्या कारवाईनंतर ग्रामस्थांनी केदारेश्वरची आरती करून पेढे वाटत फटाके आनंद व्यक्त केला.