साताऱ्यातील गांधी मैदानावर उदयनराजेंच्या हस्ते होणार महाआरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | अयोध्येतील राम मंदिरामध्ये उद्या सोमवारी दि. २२ रोजी प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्याचा उत्सव देशभरात साजरा केला जाणार असून, जिल्ह्यात हा उत्सव प्रत्येक मंदिरात, घराघरांत केला जाणार आहे. यादिवसाचे औचित्य साधून साताऱ्यातील गांधी मैदानावर सायंकाळी 6 वाजता एक लाख रामज्योती पेटविल्या जाणार आहेत. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते महाआरती देखील केली जाणार आहे.

भाजप जिल्हाध्यक्ष कदम यांनी खासदार उदयनराजे यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी नुकतीच पत्रकार परिषद घेटली. यावेळी विकास गोसावी, चिन्मय कुलकर्णी, पंकज चव्हाण, विठ्ठल बलशेटवार आदी पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहून रामज्योत प्रज्वलित करावी, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी केले आहे.

राममंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण गावातील किमान एका मंदिरात केले जाणार आहे. या दिवशी सर्वत्र रांगोळ्या काढून, गुढ्या उभारून, रामज्योत पेटवून आनंदोत्सव साजरा केला जाईल. सकाळी ११.२० ते दुपारी १२.३० या दरम्यान मंदिरात, घराघरांत अक्षतांचे पूजन केले जाईल. त्याच दिवशी साताऱ्यातील गांधी मैदानावर येथे सायंकाळी सहा वाजता एक लाख रामज्योती प्रज्वलित केल्या जातील. तेथे रामरक्षा स्तोत्र पठण, तसेच उदयनराजेंच्या हस्ते महाआरती होईल. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले जाईल.