‘छावा’मधील शिवलिंग पूजेचा ‘तो भव्यदिव्य सीन सातारा जिल्ह्यातील ‘या’ गावात झालाय शूट

0
9070
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । संतोष गुरव

‘छावा’ हा 2025 चा सर्वात मोठा ओपनर हिंदी चित्रपट म्हणून सिनेमा ठरला आहे. हा चित्रपट रिलीज झाल्यापासून हाऊसफुल्ल आहेच शिवाय तो बॉक्स ऑफिसवर एकहिल छप्पर फाडके कमाई करत आहे. विकी कौशलच्या ‘छावा’ (Chhawa Movie) ने कमाईच्या बाबतीत अनेक सिनेमांचे रेकॉर्ड मोडले आहेत. ‘छावा’ सिनेमातील असाच एक सीन प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. तो म्हणजे राज्याभिषेकाआधी छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) शंकराच्या पिंडीवर अभिषेक करतात. ‘छावा’मधील हा सीन खूप सुंदर पद्धतीने दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी (Laxman Utekar) शूट केलाय. हा सीन नेमका कुठे शूट झालाय? तर तो सातारा जिल्ह्यात. ‘छावा’मध्ये शंकराच्या मंदिराचा जो सीन दिसला आहे त्याचं शूटिंग सातारा जिल्ह्यातील बारामोटेची विहिर (Baramotichi Vihir) या ठिकाणी झालं आहे.

‘मराठ्यांची राजधानी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातील एका गावात एक भव्य विहीर आहे. या विहिरीत मराठ्यांनी एक गुप्त राजवाडा बांधला होता. जो स्वतःतच एक अद्भुत नजराणा आहे. सातारा जिल्ह्यातील शेरी लिंब या गावात ‘बारा मोटेची विहीर’ आहे. ही विहीर सुमारे ३०० वर्ष जुनी असून येथील प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळांपैकी एक आहे. दिसायला विहीर वाटणारी ही वास्तू खरंतर एक राजवाडा आहे.

अत्यंत रहस्यमयी पद्धतीने या विहिरीमध्ये दुमजली राजवाडा बांधण्यात आला आहे. सातारा शहराकडून जो रस्ता पुण्याकडे येतो तिथे १२ कि.मी. अंतरावर लिंब फाटा लागतो. तिथून आत गेल्यावर लिंब नावाचं गाव आहे. गावातील शेरीची वाडी या ठिकाणी बारामोटेची विहिर आहे. विहिरीची रचना थक्क करणारी आहे.

या विहिरीतून पाणी काढण्यासाठी एकाच वेळी १२ मोटा लावल्या जातात. विशेष म्हणजे विहिरीत राजवाडा आणि महालासारखी जागा असलेली दिसते. याशिवाय गेल्या ३०० वर्षात या विहिरीचं पाणी कधीही आटलं नाही. या विहिरीचं ऐतिहासिक महत्वही खास आहे. ‘छावा’मधील छत्रपती संभाजी महाराजांच्या सीनचं याच ठिकाणी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी शूटिंग केलंय.

WhatsApp Image 2025 02 24 at 4.44.01 PM

12 मोटेची विहिरीचं ऐतिहासिक महत्व (Baramotichi Vihir)

साताऱ्यातील ‘बारामोटेची विहीर’ ही अत्यंत वेगळ्या आणि लक्षवेधी पद्धतीने बांधण्यात आली आहे. खरंतर ही विहीर नसून राजवाडा असल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येत नाही. या विहिरीचे संपूर्ण काम हेमाडपंथी पद्धतीने करण्यात आले आहे. विहिरीच्या दगडांमध्ये कोरीव शिल्प पहायला मिळतात. विहिरीत उतरण्यासाठी दगडामध्ये जिना आणि भरवक्कम दरवाजादेखील तयार करण्यात आला आहे. या विहिरीच्या मध्यभागी २ मजली राजवाडा बांधलेला असून त्याला अत्यंत गुप्त पद्धतीने आकार देण्यात आलेला आहे.

bara motechi vihir

कोणी बांधला गुप्त राजवाडा?

इ.स.वी सन १७१९ ते १७२४ या दरम्यान थोरले शाहू महाराजांची पत्नी विरुबाई यांनी ही ‘बारामोटेची विहीर’ (Baramotichi Vihir) बांधल्याचे सांगितले जाते. ही विहीर मराठ्यांच्या बैठकी पार पाडण्यासाठी गुप्त स्वरूपात बांधण्यात आली होती. या विहिरीची खोली जवळपास १०० फूट खोल आणि ५० फुट रुंद अशी आहे. असं म्हणतात की, या विहीरीचे बांधकाम करतेवेळी या परिसरात ३३० आंब्याची कलमं लावून आमराई तयार करण्यात आली होती. ज्यामुळे अत्यंत गुप्त स्वरूपात या विहिरीत राजवाडा बांधणे शक्य झाले. स्थापत्यशास्त्रातील उत्तम नमुना म्हणून या विहिरीच्या बांधकामाकडे पाहिलं जातं.