कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदान अधिकाऱ्यांस मशीन हाताळणी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदान अधिकारी ३ व ४ यांचे पहिले प्रशिक्षण यशवंतराव चव्हाण स्मृति सदन (टाऊन हॉल) कराड येथे नुकतेच पार पडले. यावेळी निवडणूकीदरम्यान काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार यांनी ईव्हीएम मशीनबाबत तसेच बीयु, सीयु, व्हीव्हीपॅट मशीन बाबत तपशीलवार माहिती दिली. प्रशिक्षण वर्गास कराड दक्षिण निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार यांनी  आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन केले. यावेळी नायब तहसीलदार हेमंत बेसके, युवराज पाटील उपस्थित होते.

यावेळी कराड दक्षिण निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे म्हणाले, १९ तारखेला कर्तव्यावर निघण्यापूर्वी एक छोटे बुकलेट दिले जाईल त्यातील अनुक्रमांकानुसार टीमने सर्व साहित्य भारतीय बैठक मारून तपासून घ्यावे. मतदानाच्या आदल्या दिवशीची सर्व कामे पूर्ण करण्यास केंद्राध्यक्ष व टीमला मदत करायची आहे. कराड दक्षिण मधील ३४२ मतदान केंद्रांपैकी १ केंद्र सर्व दिव्यांग (अपंग) अधिकारी व कर्मचारी असतील आणि तेच संपूर्ण केंद्र चालवतील तर २ केंद्र सर्व महिला अधिकारी व कर्मचारी चालवतील आणि १ केंद्र सर्व युवक अधिकारी व कर्मचारी असतील आणि तेच संपूर्ण केंद्र चालवतील.

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार यांनी ईव्हीएम मशीनबाबत तसेच बीयु, सीयु, व्हीव्हीपॅट मशीन बाबत, व्हीव्हीपॅट मशीनच्या पाठीमागील नॉब बाबतही माहिती दिली. सर्व मशिन्स हातात मिळालेनंतर, सर्व सील व्यवस्थित आहे का?, मशीन चे सिरीयल नंबर तेच आहेत का? याची खात्री करून घ्यावी असे सांगितले. तसेच कंपार्टमेंट खिडकीतून मशिन्स दिसणार नाहीत याची काळजी घ्यावी अशा सूचना करून सर्व मशीनचे प्रात्यक्षिक दाखविले.