जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्या; एम. व्यंकटेशन यांचे प्रशासनास निर्देश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन अधिनियम 2013 च्या अंमलबजावणीबाबत साताऱ्यात राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. व्यंकटेशन यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या प्रशासनाने सोडवाव्यात. त्याचबरोबर त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश एम. व्यंकटेशन यांनी प्रशासनास दिले.

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या या बैठकीस आमदार दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे, नगर प्रशासन अधिकारी अभिजीत बापट यांच्यासह विविध नगरपरिषदांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्री. व्यंकटेशन म्हणाले, सफाई कामगारी यांची प्रत्येक महिन्याला आरोग्य तपासणी करावी. बैठकीत उपस्थित केलेल्या तक्रारींबाबत प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावे. सफाई कर्मचाऱ्यांच्या काही तक्रारी असल्यास आयोगाच्या दूरध्वनी क्रमांकावर तसेच संकेतस्थळावर कराव्यात. सफाई कर्मचाऱ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत या योजनांचाही लाभ देण्यात यावा.

यावेळी आमदार दीपक चव्हाण यांनी सफाई कामगारांच्या शिक्षणाानुसार त्यांना बढती देण्यात यावी. सफाई कामगार नगरपरिषदांच्या घरांमध्ये राहत आहे ती घरी त्यांच्या नावावर करावीत. तसेच कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना कायम करावे अशा मागण्या बैठकीत मांडल्या.

यावेळी जिल्हाधिकारी डूडी म्हणाले की, सफाई कर्मचारी 35 वर्षाहून अधिक काळ शासकीय निवासानात राहत आहेत ते निवासस्थान त्यांच्या नावावर करण्याची कार्यवाही नगरपरिषद यांनी करावी. त्याचबरोबर सफाई कर्मचाऱ्यांची प्रत्येक महिन्याला आरोग्य तपासणी करावी. या कर्मचाऱ्यांना अन्य कोणत्याही प्रकारचे काम लावू नये. ज्या कर्मचाऱ्यांना घरे नाहीत अशा सफाई कर्मचाऱ्यांना रमाई आवास योजनेतून घरकुल उपलब्ध करून देण्यात येईल.