सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यातील प्रमुख धरणांत अल्प पाणीसाठा शिल्लक असल्याने पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. गत वर्षी कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी, बलकवडी या सहा धरणांत २६.३४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. मात्र मागील वर्षी कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणे पूर्ण क्षमतेने भरली नाहीत. यंदा या प्रमुख धरणात १९.२४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
जिल्ह्यातील धोम, उरमोडी, बलकवडी, तारळी धरणांत गत वर्षीच्या तुलनेत कमी शिल्लक आहे. मॉन्सून वेळेत न आल्यास पाणीटंचाईला समोरे जावे लागणार आहे. माण, खटाव या दुष्काळी तालुक्यांसह सातारा तालुक्यासाठी उरमोडी धरण महत्त्वपूर्ण आहे. मात्र सर्वात भीषण परिस्थिती उरमोडी धरणातील पाणीसाठ्याची झाली आहे. या धरणात अवघा साडेचार टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
गत वर्षीच्या तुलनेत या धरणात निम्मा पाणीसाठा शिल्लक आहे. धोम धरणात गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. राज्याच्या वीज निर्मितीच्या दुष्टीने महत्त्वाचे असलेल्या कोयना व कण्हेर धरणांत पाणीसाठ्याची परिस्थिती बरी असून कोयनेत १३.२४ टक्के, तर कण्हरे १२.६६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.