सातारा प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील वडूज येथील तहसील कार्यालयात आज एक अनोखा प्रकार घडला. येथील एका विभागाचा कारभार आज चावी हरवल्याने कुलूपबंद राहिला. दुपारी १२:३० वाजेपर्यंत चावीच सापडली नसल्यामुळे नागरिकांचा कामांचा खोळंबा झाल्याचे पाहून सामाजिक कार्यकर्त्यांनीच हे कुलूप तोडले आणि त्यानंतर कामकाज सुरू झाले.
आज आठवड्याचा पहिला दिवस तसेच गेली 2 दिवस कार्यालयाला सुटी असल्याने खटाव तालुक्यातील वडूज तहसीलदार कार्यालयात विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. कार्यालयातील एका खोलीत आवक-जावक, रोजगार हमी, पुनर्वसन अशा तीन विभागांचे कामकाज चालते. या विभागाशी कामाशी संबंधित नागरिक येथे सकाळपासून थांबले होते. मात्र, या तिन्ही विभागांचे कामकाज चालणाऱ्या खोलीच्या कुलपाची चावी सापडत नव्हती.
त्यामुळे दुपारी बारा वाजले तरी येथील कामकाज थांबले होते. येथील विभागाशी संबंधित काही अधिकारी अन्य विभागांत जाऊन आपणाशी संबंधित काम करण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, बहुतांशी नागरिकांची कामे ठप्पच होती. तहसीलदार कार्यालयात कुलूपाविना थांबलेले काम व नागरिकांची झालेली गर्दी पाहून येथील सामाजिक कार्यकर्ते विजय शिंदे व सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. संबंधित खोलीला लावण्यात आलेल्या कुलपाच्या चाव्या सापडत नसल्याने कामे थांबली असल्याचे त्यांना समजले.
अखेरीस दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांनी हे कुलूप तोडले. त्यानंतर या विभागाशी संबंधित कामकाजाची सुरुवात करण्यात आली. शिंदे यांच्या पुढाकारामुळे अनेक नागरिकांच्या खोळंबलेल्या कामांना सुरुवात झाली. नागरिकांनी शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांना धन्यवाद दिले.