सातारा प्रतिनिधी | पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात भैरवनाथ मंदिरानजीक बुधवारी मध्यरात्री अवजड वाहने बंद पडल्याने मध्यरात्रीपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, घाट रस्त्यावरील वाहतूक धिम्यागतीने सुरू होती. यामुळे प्रवासी सुमारे 7 ते 8 तास कोंडीत अडकले होते. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास वाहतूक पूर्ववत करण्यात पोलिसांना यश आले.
खंबाटकी घाटातील भैरवनाथ मंदिरानजीक वळणावर सोमवारी दुपारी कंटेनर बंद पडला होता. त्यामधील मालाचे वजन जास्त असल्याने तो बाजूला करणे शक्य नव्हते. या ठिकाणी वळण आणि चढ असल्याने इतर वाहनांनाही अडथळा निर्माण झाला होता. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास दुसरे एक अवजड वाहतूक करणारे वाहन बंद पडले. त्यामुळे या मार्गावर मोठी कोंडी झाली होती. भैरवनाथ मंदिराजवळ कंटेनर व अन्य एक वाहन बंद पडल्याने सातारा बाजूकडे जाणारी वाहतूक खोळंबली. मंगळवारी सकाळी महामार्गवर वाहनांची वर्दळ वाढली. यावेळी वाहतूक कोंडी बरोबर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या.
महामार्गावर सकाळपासून वाहनांची वर्दळ वाढताना घाटरस्त्यावर वाहतूक मात्र धिम्यागतीने सुरु होती. त्यामुळे अनेक पर्यटक, प्रवासी काही तास खोळंबल्याची माहिती आहे. सकाळी 11 च्या सुमारास खासगी क्रेनच्या सहाय्याने बंद पडलेली वाहने बाजूला करून महामार्ग व खंडाळा पोलिसांनी वाहतूक पूर्ववत केली.