सातारा प्रतिनिधी । सध्या जिल्ह्यात गावोगावी सुरू असणाऱ्या यात्रा- जत्रा, लग्नसराई व उन्हाळी सुट्टीमुळे लहान चुमुकल्यांसह मोठेही फिरण्याची मजा लुटत आहेत. जिल्ह्यातील सातारासह तालुक्यातील बसस्थानके सध्य प्रवाशांच्या गर्दीने गजबजून गेली आहेत. लांब पल्ल्यासह अन्य मार्गावर धावणाऱ्या बसेस प्रवाशांनी हाऊसफुल्ल होत आहेत. त्यामुळे प्रवाशाच्या आवडत्या लाल परीला उन्हाळी हंगामात अच्छे दिन आल्याचे दिसत आहे. उन्हाळी सुट्टीमुळे प्रवाशांची वर्दळ वाढल्याने एसटी महामंडळाच्या महसुलात चांगलीच भर पडली आहे.
सध्या शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी लागल्यामुळे बहुतांश जणांनी सहलीचे बेत आखले आहेत. तसेच महिलांना एस.टी प्रवासात ५० टक्के सवलत असल्याने महिला प्रवाशांची संख्या चांगलीच वाढली असल्याचे चित्र आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील मध्यवर्ती बसस्थानक म्हणून सातारा बसस्थानकाची ओळख आहे. या बसस्थानकातून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोकण, गोवा, बेळगाव, – कर्नाटक, विजापूर, हैदराबाद, नांदेड, उस्मानाबाद, नगर, सोलापूर, गाणगापूर, मुंबई, पुणे, यासह विविध मार्गावर बसेस जात असतात. त्यामुळे या बसस्थानकात प्रवाशांची सतत गर्दी असते.
बसस्थानक सकाळपासून प्रवाशांच्या गर्दीन गजबजून जात आहे. सध्या लांब पल्ल्याच्या मार्गावर जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. तसेच ज्या मार्गावर प्रवाशांची संख्या जास्त आहे. अशा मार्गावरही विविध आगारातून जादा बसेस सोडण्यात येत आहेत. स्वारगेटला तर सातारा बसस्थानकातून दर १५ मिनिटाला बसेस सोडण्यात येत असली तरी प्रवाशांची गर्दी हटेनाशी झाली आहे. त्यामुळे एसटीला उन्हाळी हंगाम फायद्याचा ठरत आहे. प्रवासी वाढल्याने महसुलात वाढ झाली आहे.