सातारा प्रतिनिधी | पुणे सातारा रोडवर सालपे घाटात केनॉल जवळपास रात्रीच्या सुमारास टेम्पो चालकाचा ताबा सुटल्याने चालकासह टेम्पो पुलाचे कठडे तोडून सुमारे 40 ते 50 फूट खाली कालव्याच्या दगडात कोसळला. दि. १६ रोजी ही घटना घडली. यामध्ये टेम्पो चालक गंभीर जखमी झाला होता. अंधारात तो बाहेर काढण्यासाठी ओरडत होता. लोणंद पोलीसांना माहिती मिळताच पोलीसांची टीम घटनास्थळी दाखल झाली. या घटनेनंतर पोलिसांनी धाव घेत चालकास बाहेर काढत जीवदान दिले.
याबत अधिक माहिती अशी की, अंधारात आणि कडाक्याच्या थंडीत लोणंद पोलीसांनी तत्परता दाखवत दोन क्रेन बोलविण्यात आल्या. या दोन क्रेनच्या साह्याने लोणंद पोलीसांची टीम दरीत उतरली. आयशर टेम्पो दोन मोठ्या दगडात अडकला होता. चालक जखमी अवस्थेत ओरडत होता. अंधाऱ्या रात्री बॅटरीच्या मदतीने मोठया तीन तासाच्या प्रयत्नानंतर गाडीचा दरवाजा तोडून प्रथम चालक सुमित पांडूरंग गावड रा. पन्हाळा, जि. कोल्हापूर यास बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
यामध्ये लोणंद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सुशील भोसले, पोलीस हवालदार अतुल कुंभार, सर्जेराव सुळ, पोलीस कॉन्स्टेबल संजय चव्हाण, वाघमोडे, पोलीस पाटील शांताराम पाटील, पोलीस मित्र सागर शेळके, धनंजय धायगुडे , सुजित धायगुडे, अनिकेत कोळपे, महेश बिचुकले यांच्या तीन तासाच्या अथक परिश्रमामुळे जखमी अवस्थेत अडकलेल्या टेम्पो चालकास बाहेर काढून वैद्यकिय उपचारासाठी पाठवणे शक्य झाल्याने जखमी टेम्पो चालक युवकास जीवदान मिळाले असून या सर्वांचे सर्वच स्थरातून अभिनंदन होत आहे.