सातारा प्रतिनिधी । लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज गुरुवारी कांद्याच्या बाजारात कांद्याचे लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय लोणंद मार्केट यार्डातील कांदा व्यापाऱ्यांनी घेतला आहे. किरकोळ कारणांवरून कामगार व व्यापारी यांच्यात झालेल्या समज-गैरसमजामुळे हा निर्णय घेतला असल्याचे कारण सांगितले जात आहे. त्यामुळे आज बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या कांद्याचे लिलाव होणार की नाही, याबाबत संभ्रमावस्था आहे.
लोणंद मार्केट यार्डात सध्या १८०० ते २००० पिशव्यांपर्यंत कमी प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. त्यामुळे मार्केट यार्डातील कोणत्याच व्यापाऱ्यांना कांदा खरेदीसाठी पुरत नाही. कांद्याचे ट्रक भरती होत नाहीत. त्यातून कांद्याचे भावही चार ते साडेचार हजार रुपयांपर्यंत प्रतिक्विंटलला तेजीत निघत आहेत. मागणीप्रमाणे कांद्याचा पुरवठा होत नाही, अशी अवस्था आहे. त्यातून येथील बाजारात कांदा विक्रीसाठी आल्यावर प्रथम कांद्याचे वजन होते. त्यानंतर तो व्यापारी काट्यावर उतरवला जातो. त्यानंतर लिलाव होतात.
मात्र, बाजार समितीचे सभापती प्रा. सुनील शेळके- पाटील यांनी कांद्याचे लिलाव सुरूच राहावेत, यासाठी ठोस भूमिका घेत उद्या संचालक मंडळ, व्यापारी व कामगारांची तातडीची बैठक बोलण्याची मागणी होत आहे. कोणत्याही स्थितीत लिलाव सुरू ठेवण्याचा बाजार समितीचा प्रयत्न आहे. मात्र, शेतकऱ्यांत याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
अशा आहेत मागण्या
पणन महामंडळाच्या नियमानुसार प्रथम व्यापारी काट्यावर आवक उतरवणे, त्यानंतर लिलाव व लिलावानंतर वजनकाटा व्हावा. जेणेकरून शेतकरी वजन होईपर्यंत आपल्या मालाजवळ थांबून राहतील आणि कांद्याच्या होणाऱ्या लपवालपवीलाही आळा बसेल, अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे. मात्र, ही बाब शेतकऱ्यांना त्रासदायक आहे. त्यामुळे बाजार समिती, कामगार व शेतकरीही व्यापाऱ्यांच्या या म्हणण्याला तयार नाहीत. ज्या व्यापाऱ्यांच्या काट्यावर कांदा उतरवला आहे, त्यांनीच आलेल्या मालाची काळजी घ्यावी. त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अथवा कामगारांची नेमणूक करावी, अशा मागण्या करण्यात आलेल्या आहेत.