सातारा प्रतिनिधी । सातारा तालुक्यातील नागठाणे येथील शासकीय गोदामातून गहू आणि तांदळाची पोती चोरीचा गुन्हा बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. दरम्यान, सातारा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासांत पाच जणांच्या मुसक्या आवळल्या. तसेच एकाच्या झोपडीवजा घरातून चोरीचे धान्य हस्तगतही करण्यात आले.
शिवाजी शामराव मोहिते, विनोद सिकंदर मोहिते, वामन लिंबाजी माने आणि हेमंत हणमंत साळुंखे अशी संबंधितांची नावे आहेत. अटक केलेले पाचही संशयित नागठाणे येथील रहिवाशी आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आॅंचल दलाल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्यातील चोरी, घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याची सूचना केली होती. या अनुषंगाने पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांनी पोलिस उपनिरीक्षक पतंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार केले होते. असे असतानाच शुक्रवारी पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना नागठाणे येथील गुन्हेगाराने गावातीलच शासकीय गोदामातील गहू आणि तांदूळ चोरुन झोपडीवजा घरात लपविल्याची माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे त्यांनी पथकास कारवाईची सूचना केली. त्यावेळी पोलिसांच्या रेकाॅर्डवरील जानवर शाैकत भोसले याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्यानंतर त्याच्या झोपडवजा घरातून गहू, तांदूळ हस्तगत करण्यात आला. तसेच जानवर भोसले याच्या इतर चाैघा साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले. पोलिस निरीक्षक अरुण देवकर, उपनिरीक्षक पतंग पाटील, सहायक पोलिस उपनिरीक्षक तानाजी माने, सुधीर बनकर, विश्वनाथ संकपाळ, हवालदार मंगेश महाडिक, लक्ष्मण जगधने, मोहन नाचण, प्रवीण कांबळे, मोहसीन मोमीन, धीरज महाडिक, संकेत निकम आदींनी कारवाईत भाग घेतला.