सातारा जिल्ह्यात 10 लाख 37 हजार पशुधनाची नोंद; आतापर्यंत 1760 गावांत सर्व्हे पूर्ण

0
315
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । जिल्हा पशु संवर्धन विभागाच्या वतीने सातारा जिल्ह्यातील पशुगणना करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. दरम्यान, पशुगणना करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, आतापर्यंत १ हजार ७६० गावांतील सर्व्हे पूर्ण झाला आहे. त्यानुसार १० लाख ३७ हजार पशुधनाची नोंद झाली आहे. आता सर्व्हसाठी पाच दिवसच हातात राहिले आहेत. त्यामुळे उर्वरित २२८ गावांत ३१ मार्च अखेरपर्यंत ही मोहीम पूर्ण करावी लागणार आहे.

केंद्र शासनाच्या वतीने दर पाच वर्षांनी पशुगणना करण्यात येते. यंदा प्रथमच ऑनलाइन पशुगणना होत आहे. यामध्ये १६ प्रजातींची नोंद करण्यात येत आहे. गाय, बैल, म्हैस, रेडे, शेळी, मेंढी, घोडा, गाढव, कुत्रा, मांजर, डुक्कर आदी पशुधन तसेच कोंबड्यांचीही गणना केली जात आहे. यातील काही पशुंची प्रथमच गणना होत आहे. त्यातच शासनाच्या निर्णयानुसार २५ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी अशी पशुगणना करण्यात येणार होती; पण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता होती. त्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतर पशुगणनेला सुरुवात झाली. परिणामी, या मोहिमेला उशीर झाला. तसेच एक महिन्याची मुदतवाढही देण्यात आली.

सातारा जिल्ह्यात मागील चार महिन्यांपासून पशुगणना सुरू आहे. यासाठी प्रगणक आणि पर्यवेक्षकांचीही नियुक्ती करण्यात आलेली आहे. ३१ मार्चपर्यंत ही पशुगणना पूर्ण करावी लागणार आहे. जिल्ह्यात १ हजार ९८८ गावांत ही मोहीम सुरू आहे. आतापर्यंत त्यातील १ हजार ७६० गावांतील पशुधनाची नोंद पूर्ण झाली आहे. उर्वरित २२८ गावांतही. पशुगणनेने वेग घेतला आहे.

सातारा जिल्ह्यात एकूण 88 टक्के काम पूर्ण

सातारा जिल्ह्यातील सर्व गावांत आणि कुटुंबापर्यंत जाऊन पशुधनाची नोंद करायची आहे. आतापर्यंत ७लाख १ हजार ९४ कुटुंबांना प्रगणकांनी भेट देऊन तेथील पशुधनाची नोंद केलेली आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात पशुगणनेचे काम ८८ टक्के पूर्ण झालेले आहे.

लक्ष ठेवण्यासाठी ४६ पर्यवेक्षक नियुक्त

पशुगणनेसाठी जिल्ह्यात २१६ प्रगणकांची नियुक्ती केली आहे. त्यांना मानधन देण्यात आलेले आहे. या प्रगणकांनी गावात फिरून अॅपमध्ये ऑनलाइन नोंद करायची आहे. तसेच प्रगणकांना गावे वाटून देण्यात आलेली आहेत. एका प्रगणकाला ग्रामीणमध्ये ३ हजार तर शहरात ४ हजार कुटुंबांना भेट 3 द्यायची आहे. प्रगणकांवर लक्ष ठेवण्यासाठी ४६ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आलेले आहेत.

पशुगणनेचे काम 88 टक्के पूर्ण

सातारा जिल्ह्यात पशुगणनेचे काम ८८ टक्के पूर्ण झालेले आहे. १ हजार ९८८ पैकी २२८ गावांतील सर्व्हे राहिलेला आहे. हा सर्व्हे मार्चअखेरपर्यंत पूर्ण होईल. जिल्ह्यातील पशुगणनेची आकडेवारी सकारात्मक आहे. दिलेल्या मुदतीत पशुगणना पूर्ण होईल, अशी प्रतिक्रिया पशु संवर्धन विभागाचे उपयुक्त डॉ. दिनकर बोर्डे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र‘ शी बोलताना दिली आहे.