सातारा प्रतिनिधी | यशवंतराव चव्हाण ते मनोहर जोशी या मुख्यमंत्र्यांपर्यत राजकारणातील सुसंस्कृतपणा टिकून होता. मात्र, दुर्देवाने सध्याच्या राजकारणात सुसंस्कृतपणा टिकून राहिला नाही. माझी जात व धर्मापेक्षा माझा देश सर्वोच्च आहे ही भावना प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे. परंतु, आता देश विचित्र दिशेने चालला असल्याचे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक व कवी रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले.
जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीच्यावतीने आयोजित २३ वा जिल्हा ग्रंथ महोत्सव जिल्हा परिषदेच्या मैदानावर नाटककार डॉ. विश्वास मेहेंदळे नगरीत ४ दिवस उत्साहात पार पडला. रामदास फुटाणे म्हणाले,”प्रत्येकाने वाचन संस्कृतीत रमले पाहिजे. जी माणसे पुस्तके वाचतात त्याची निर्णयक्षमता चांगली असते तर, काय स्वीकारावे व काय नाकारावे हे त्यांना लवकर उमजते. दरम्यान, केंद्र सरकारने आरक्षण दिले तरी सगळ्या मुलांना नोकऱ्या मिळणार नाहीत. त्यामुळे जगण्याचे पर्याय स्वत:ला निर्माण करता आले पाहिजेत.” राजकारणात सुसंस्कृत पणाची परंपरा लोप पावली असून जाती जातीच्या संदर्भाने राजकारण सुरू आहे.
अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र. कुलगुरू डॉ. अशोक भोईटे होते. यावेळी ग्रंथ महोत्सवाचे अध्यक्ष प्रा. डॉ. यशवंत पाटणे, कार्यवाह शिरीष चिटणीस, कोषाध्यक्ष प्रदीप कांबळे, प्रा. प्रमोदिनी मंडपे, माजी शिक्षणाधिकारी राजकुमार निकम, डॉ. राजेंद्र माने व समितीचे सदस्य उपस्थित होते.