सातारा प्रतिनिधी । शिक्षण देताना सर्व विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव हा नाही. शिक्षकडून सर्वांना ज्ञानार्जनाचे धडे दिले जातात. मात्र, साताऱ्यात एका शाळेत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाळेच्या तुकड्या करताना विद्यार्थ्यांच्या जातीसह याद्या प्रसिद्ध करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार साताऱ्यातील निर्मला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये घडला असून यानंतर शाळेच्या निषेधार्थ विविध संघटनांसह पालकांनी आंदोलन केले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची पालकांनी भेट घेत त्यांना निवेदन देत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून जिल्हाधिकाऱ्यांनी देखील चौकशीचे आफेश दिले आहेत.
सातारा शहरातही निर्मला कॉन्व्हेंट स्कूल या मिशनरी शाळेकडून नवीन वर्षाच्या तुकड्या करताना विद्यार्थ्यांचा जातीसह उल्लेख करून याद्या पालकांना पाठवण्यात आल्या. ही बाब उघडकीस येताच पालक संतप्त झाले. त्याचा सर्व स्तरांवरून निषेध सुरू होत पडसाद उमटू लागले आहेत. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून, त्यांनी बंद शाळेच्या फाटकाला निषेधाचे पत्र लावत आंदोलन केले.
या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी करत सातारकर संतप्त झाले असून, सोमवारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना निवेदन देण्यात आले. सर्वत्र निषेध केला जात असताना शाळेकडून अद्याप कोणताही खुलासा न आल्याने संताप वाढला आहे.